नाशिक : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या षड्रात्री उत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्त घराघरांत वेगवेगळ्या पद्धतीने खंडोबाची आराधना सुरू झाली. नवरात्रीप्रमाणेच काही घरांमध्ये या सहा दिवसांमध्ये घट बसविले जातात, तर काही घरांमध्ये केवळ दिवा लावून हा कालावधी साजरा केला जातो. याबाबत असे सांगितले जाते की, मढी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला. त्यांच्याशी युद्धाला प्रारंभ झाला तो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा होता. मार्तंडाच्या विजयासाठी देवऋषींनी एक प्रतिष्ठान स्थापन केले. तसेच युद्धात देवांना जसजसा विजय प्राप्त होऊ लागला तसतसे प्रत्येक दिवशी पुष्पमाला त्या प्रतिष्ठानाला अर्पण करू लागले. तेव्हापासून मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असा सहादिवसीय उत्सव साजरा होतो, असे सांगितले जाते. या उत्सवाला षडरात्र उत्सव असे म्हणतात. चंपाषष्टीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते. प्रत्येक ठिकाणी पूजेची वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी गोंधळ, तर काही ठिकाणी घट बसविले जातात. चंपाषष्टीच्या दिवशी कुळधर्म केला जातो. त्यात कांदे आणि वांग्याचे भरीत तसेच भाकरी, पुरणपोळी यांचा नैवेद्य दाखवित खंडोबाची तळी भरली जाते आणि या दिवसापासून चतुर्मासात बंद असलेले कांदा आणि लसूण खायलाही सुरुवात केली जाते. (प्रतिनिधी)
खंडेरायाच्या षड्रात्रीस प्रारंभ
By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST