भैरवनाथ यात्रेस उत्साहात प्रारंभ
By Admin | Updated: April 22, 2016 01:16 IST2016-04-22T01:06:49+5:302016-04-22T01:16:50+5:30
भाविकांची गर्दी : गंगाजलाच्या कावडीची मिरवणूक

भैरवनाथ यात्रेस उत्साहात प्रारंभ
सिन्नर : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त गुरुवारी सकाळपासून भैरवनाथ महाराज मुखवट्याची, रथाच्या व गंगाजलाच्या कावडींची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवारपासून सुरू झालेली यात्रा दोन दिवस चालणार आहे. नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील भैरवनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी जिल्हाभरातून भाविक आले होते.
सकाळी ६ वाजता भैरवनाथ मंदिराचे मुख्य पुुजारी त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते रथपूजन करण्यात येऊन ढोल-ताशाच्या निनादात व टाळमृदंगाच्या गजरात रथाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. नाशिकवेस, गंगावेस, खडकपुरा, लाल चौक, महालक्ष्मी रोड, वावीवेस, लोंढे गल्लीतून गावठा, तानाजी चौक, गणेशपेठ, शिंपी गल्ली, नाशिकवेस अशा शहराच्या जवळपास सर्वच रस्त्यावरून रथ व कावडींची मिरवणूक काढण्यात आली. रथाला श्रीफळ वाढवून दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भजनी मंडळाची दिंडी काढण्यात आली होती. पाचोरे घराण्याकडे रथ हाकण्याचा मान होता. रथावर दोन्ही बाजूस भालदार-चोपदार उभे राहून देवाच्या मूर्तीस चौराने वारा घालीत होते. रथ दर्शनासाठी आबालवृद्धांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. बैलाचा खांदा रथाच्या जोत्याला लावून रथ ओढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. सजवलेल्या बैलांना रथास जुंपल्यावर थोडासाच रथ पुढे सरकला की, दुसरा शेतकरी बैल घेऊन हजर राहत होते. दिवसभर ही लगबग सुरू होती. रथाच्या जुंवावर घरोघरी नारळ वाढविले जात होते.
रथामागे कावडीधारक सहभागी झाले होते. लहान मुलांना कावडी खांद्यावर देऊन त्यांची ती आठवण जपून ठेवण्यासाठी छायाचित्र काढून घेण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू होती. रथाची पूजा करून त्या पाठोपाठ चालत असलेल्या कावडीधारकांना पाटावर उभे करून त्यांचे पाय धुऊन सुवासिनी कावडीधारकांच्या पदस्पर्शाने धन्य झाल्याच्या समाधानाने पूजेचे ताट सांभाळत मार्गस्थ होत होत्या. त्यांना गूळ-खोबरे, पेढे, खडीसाखर, फुटाणे यांचा प्रसाद दिला जाता होता.
रथामागे असलेल्या कावडीधारकांचे पदप्रक्षालन व प्रसाद वाटपासाठी मोठी गर्दी झाली होती. रथामागे कावडी घेऊन पायी चालणाऱ्या कावडीधारकांना भाविकांकडून सरबत तसेच प्रसादाचे वाटप केले जात होते. (वार्ताहर)