अनधिकृत भंगार बाजार हटविण्यास प्रारंभ
By Admin | Updated: January 8, 2017 01:50 IST2017-01-08T01:50:23+5:302017-01-08T01:50:41+5:30
मनपाची मोठी कारवाई : व्यावसायिकांचा विरोध मावळला

अनधिकृत भंगार बाजार हटविण्यास प्रारंभ
नाशिक : शहरातील चुंचाळे शिवार आणि अंबड-लिंकरोडवरील वादग्रस्त ठरलेला बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजार हटविण्यास महापालिकेने शनिवारपासून (दि.७) सुरुवात केली. न्यायालयासह शासन व राजकीय स्तरावरून बाजार वाचविण्यासाठी सारे प्रयत्न विफल ठरल्यानंतर व्यावसायिकांचा विरोध मावळला आणि अनेकांनी स्वत:हून भंगार माल रात्रीतून अन्यत्र हलविला. महापालिकेच्या इतिहासात आजवरची ही सर्वांत मोठी कारवाई ठरली असून, सुमारे ४० ते ५० एकर परिसरात पसरलेला हा बाजार पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी आणखी काही दिवस मोहीम चालणार आहे.
महापालिकेने पोलीस आयुक्तालयाच्या साथीने शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा वादग्रस्त अनधिकृत भंगार बाजार हटविण्याची तारीख मुक्रर केल्यानुसार शनिवारी (दि. ७) सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबड-लिंकरोडवर मोठ्या प्रमाणांवर वाहनांसह महापालिकेचे पथक आणि प्रचंड पोलीस फौजफाटा जमला आणि सकाळी ९ वाजेच्या सुमारास पथकाने जेसीबी, पोकलॅनचे पंजे अनधिकृत बांधकामांवर उगारण्यास सुरुवात केली. अंबड-लिंकरोडवरील बजरंगनगर, दत्तमंदिर चौक ते संजीवनगरदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालविण्यात आले. मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेले लोखंडी व पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. कारवाई थांबविण्याबाबत भंगार बाजार व्यावसायिकांकडून सारे प्रयत्न फसल्यानंतर कारवाईपूर्वीच शुक्रवारी (दि.६) रात्री व्यावसायिकांनी शेडमधील मालाची अन्यत्र विल्हेवाट लावली. त्यामुळे अनेक शेडचे सांगाडेच हटविण्याची कार्यवाही मनपाला करावी लागली. काही ठिकाणी व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवानगी घेण्यासंबंधीची कागदपत्रे दाखविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात तथ्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पथकाकडून कारवाई पूर्ण करण्यात आली. दिवसभरात महापालिकेने मोठ्या प्रमाणावरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.