सत्ताधाऱ्यांकडून कॉर्नर सभांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:09 IST2017-07-18T00:08:52+5:302017-07-18T00:09:05+5:30
मविप्र संस्था निवडणूक

सत्ताधाऱ्यांकडून कॉर्नर सभांना सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकाधिकारशाहीचा आरोप सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यावर मविप्रचे सभापती अॅड. नितीन ठाकरे यांनी केल्यानंतर त्यांना शहरात कॉर्नर सभा घेऊन श्रीमती नीलिमा पवार यांनी केलेल्या कामांची यादीच सादर करत प्रत्युत्तर दिले आहे.
येत्या ३ आॅगस्टला प्रत्यक्षात सत्ताधारी पॅनलच्या नावाची घोषणा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. गेल्या तीन चार दिवसांपासून श्रीमती पवार यांनी प्रभागनिहाय कॉर्नर सभांना सुरुवात केली आहे. शनिवारी (दि.१५) त्यांनी सातपूरला तर रविवारी (दि.१६) सिडकोत कॉर्नर सभा घेतली. सोमवारी (दि.१७) त्यांनी पंचवटीत कॉर्नर सभा घेतली. पुढील काही दिवसांत शहरातील मतदारांशी त्या अशाच प्रकारे संपर्क साधणार आहेत. रविवारीच मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी पॅनलचे नेतृत्व करणारे विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे व अध्यक्ष प्रताप सोनवणे यांनी सभासदांची सहविचार सभा घेऊन विरोधी पॅनलची निर्मिती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व पुन्हा एकदा नीलिमा पवार यांच्याबरोबरच मागील काळातील त्यांचे सहकारी संचालक करण्याची चिन्हे आहेत. त्यातही काही विद्यमान संचालकांना उमेदवारी नाकारून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वर्तुळात आहे.