ठेंगोड्यात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ
By Admin | Updated: October 5, 2015 22:36 IST2015-10-05T22:33:46+5:302015-10-05T22:36:34+5:30
युवकांचा पुढाकार : शिवराजे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

ठेंगोड्यात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ
ठेंगोडा : ग्रामपंचायतीच्या वतीने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचा आदर्श घेत येथील शिवराजे सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रविवारी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी आठ वाजता महात्मा गांधी व गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सुनीता ठाकरे, गोरख सोनवणे, नामदेव अहिरे आदिंच्या हस्ते करून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी यापुढे सार्वजनिक ठिकाणी घाण व कचरा न टाकता दररोज येणाऱ्या घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले. यापुढे सार्वजनिक ठिकाणी घाण टाकल्यास घाण टाकणाऱ्यांकडून शंभर रुपये दंड वसूल करण्यात येईल, तर घाण टाकल्याचे दाखवून देणाऱ्यास पन्नास रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी मंडळाने स्वच्छता मोहिमेचा संकल्प केला. आठवड्यातील प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या भागात स्वच्छता अभियान संपूर्ण गावात राबविले जाणार असल्याचे मंडळाचे सदस्य प्राध्यापक सचिन पवार यांनी सांगितले. अभियानात गावातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले
आहे.तरुणांनी स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या स्वच्छता अभियानात गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेतला होता. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीने दिली घंटागाडी
गणेशनगर भागातील मोकळे भूखंड व सार्वजनिक जागेवरील मोकळ्या जागेवरील गाजरगवत, घाण, वाळलेल्या बाभळीची खुपटे आदिंसह अंगणवाडी केंद्र, पाण्याच्या टाकीचा परिसर, श्रीराम मंदिर परिसर तसेच महामार्गावरील गटार व आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तरुणांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेची दखल घेत ग्रामपंचायतीने कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करून दिली.