जाता जाता ‘खुर्च्या’ बदलण्यास प्रारंभ

By Admin | Updated: February 25, 2017 23:33 IST2017-02-25T23:32:49+5:302017-02-25T23:33:06+5:30

कालिदासचे नाट्य : ‘मनसे’ काम सुरू

Start to change 'chairs' on the go | जाता जाता ‘खुर्च्या’ बदलण्यास प्रारंभ

जाता जाता ‘खुर्च्या’ बदलण्यास प्रारंभ

नाशिक : ऐन निवडणुकीत राजकीय रंगमचावर ‘कालिदास’चे नाट्य गाजल्यानंतर मनसेच्या सत्ताधिकाऱ्यांनी जाता जाता खुर्च्या बदलण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, या सर्व प्रकारात मनसेला आपली खुर्ची मात्र वाचविता आली नाही, हे विशेष !
महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या कामकाजावर शेरेबाजी होत असताना जाता जाता वनौषधी उद्यान, वॉटर कर्टन तसेच शस्त्र संग्रहालय अशा उपक्रमांचे उद््घाटन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर मुंबईच्या कलावंतांना नाशिकमध्ये मनसेने केलेली कामे दाखविली जात होती. त्यातच नेमके नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेला तोंड फोडले. कालिदास कलामंदिरातील तुटक्या खुर्च्या आणि आणि अस्वच्छतेचे अनेक फोटो दामले यांनी व्हायरल केल्यानंतर राजकीय रंगमंचावरच नाट्य गाजू लागले. कलावंतांना नाशिकमधील कामे दाखविणाऱ्या राज ठाकरे यांनी कलावंताची मूलभूत समस्या असलेल्या महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराकडे कितपत लक्ष दिले अशा आशयाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे मनसेच्या चित्रपट सेनेने उलट दामले यांनाच राजकीय स्वरूपात रंगविण्यात सुरुवात केली. राजकीय वाद निर्माण झाल्याने मुळात कलावंत असलेल्या दामले यांनी त्यापासून दूर राहणे पसंत केले. परंतु मनसेला मात्र ही बाब खूपच खटकली. कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव आणि निवडणुकीनंतर होणारी कामे हे आयुक्तांमार्फत जाहीर करण्यात आले. परंतु तोपर्यंत वेळ गेली होती. सत्तापटलावर मनसेची खुर्ची गेली, परंतु जाता जाता त्यांनी कालिदासच्या खुर्च्या दुरुस्तीला प्रारंभ केला आहे. सध्या कलामंदिरात हे काम जोमाने सुरू आहे. आता लवकरच नूतनीकरणाच्या निविदा काढल्या जाणार आहे.

Web Title: Start to change 'chairs' on the go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.