बारा तास उभे... जेवणाचे वांधे...
By Admin | Updated: September 12, 2015 23:48 IST2015-09-12T23:47:40+5:302015-09-12T23:48:09+5:30
पोलिसांची परवड : सुविधांअभावी गैरसोयींचा सामना

बारा तास उभे... जेवणाचे वांधे...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सोय करण्यात स्थानिक पोलीस प्रशासन अपयशी ठरले असून, ज्या ठिकाणी नेमणूक त्या ठिकाणी पोलिसांची निवास व खाणे-पिण्याची सोय करण्याचे दावेही फोल ठरले आहेत. पोलिसांच्या जेवणाचा ठेका घेणारा ठेकेदारही निघून गेल्यामुळे तर मिळेल तेथे खाणे एवढेच त्यांच्या नशिबी उरले आहे.
कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातून काही कर्मचारी त्याचबरोबर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी अशा सुमारे बारा हजार कर्मचाऱ्यांना १० आॅगस्ट ते २० सप्टेंबर अशा ४० दिवसांसाठी कुंभमेळ्यात नियुक्ती देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी काही ठिकाणी बॅरेक उभारण्यात आले, तर पंचवटी परिसरात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नजीकच्या लॉन्स, समाजमंदिरे आदि ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. बाहेरगावाहून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी खासगी ठेकेदार नेमण्यात येऊन त्यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडून प्रतिदिवस ९५ रुपये याप्रमाणे प्रारंभीचे पंधरा दिवसांचे पैसे आगाऊ ठेकेदाराने जमा केले, मात्र ठेकेदाराकडून जेवण देण्याची वेळ व बंदोबस्ताच्या ठिकाणाहून जेवणाचे ठिकाण गाठण्यासाठी लागणारा विलंब पाहता अनेक कर्मचाऱ्यांना ते गैरसोयीचे ठरू लागले. त्यातच सुरुवातीचे पंधरा दिवस आटोपून गेल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांकडील पैसेही संपले, पगार झाल्यावर जेवणाचे पैसे देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे पाहून ठेकेदारानेही त्यांना ‘पैसे असतील तर जेवण’ असे सुनावले, परिणामी ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती त्यांनी पैसे भरले; परंतु ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांना भोजन मिळणे बंद झाले. गेल्या ८ सप्टेंबरपासून तर ठेकेदारानेही ठेका बंद करून पोबारा केल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली असून, पंचवटी व परिसरात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी नजीकच्या आखाडे व खालशांमध्ये आपली भूक शमवावी लागत आहे.
सिंंहस्थ कुंभमेळ्यासाठी कर्मचाऱ्यांना बारा-बारा तासांच्या ड्यूट्या लावण्यात आल्या आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ व रात्री नऊ ते सकाळी नऊ या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी त्यांना नेमण्यात आले त्या ठिकाणी संडास-बाथरूमची तोकडी सोय करण्यात आली आहे. याशिवाय राहण्याच्या ठिकाणीही अंथरूण-पांघरून, डास-मच्छर अशा अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असलच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत.