स्थायी समिती बैठक : नांदगाव ५६ खेडी योजनेला नवीन मंजुरी
By Admin | Updated: July 4, 2017 00:28 IST2017-07-04T00:27:04+5:302017-07-04T00:28:03+5:30
ग्रामसडक, कुपोषणावर वादळी चर्चा

स्थायी समिती बैठक : नांदगाव ५६ खेडी योजनेला नवीन मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय पुन्हा जिल्हा परिषदेच्या आवारात आणावे, तसेच या योजनेत कामे मंजूर करताना त्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा, असा ठराव सोमवारी (दि.३) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
दरम्यान, कुपोषण, शिक्षक बदल्या, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती यावरून सभा वादळी ठरली. बैठकीस अध्यक्ष शीतल सांगळे, सभापती सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब क्षीरसागर, यतिन कदम, भास्कर गावित, शंकरराव धनवटे, डॉ. भारती पवार, सविता पवार, किरण थोरे आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे चुकीच्या प्राधान्यक्रमाने मंजूर करण्यात आल्याचा आरोप सभापती यतिन पगार यांनी केला. उपअभियंता हेमंत पाटील यांनी आमदारांच्या समितीने सूचविलेल्या कामांनुसार तसेच प्राधान्यक्रमानुसार ही कामे मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. कामे बदलायची असतील, तर आमदारांकरवी बदला, असे सांगताच सभागृहातील सदस्य संतप्त झाले. आमदार आणि आमच्यात वाद लावू नका, असे यतिन कदम व यतिन पगार यांनी सांगितले. आसखेडा ते शिरपूरवाडे हा रस्ता रहदारी नसताना मंजूर करण्यात आल्याचे यतिन पगार यांनी सांगितले तर चाटोरी ते भेंडाळी हा रस्ताही असाच रहदारी नसताना मंजूर करण्यात आल्याचा आरोप यतिन कदम यांनी केला. १२८ कोटींचे रस्ते होत असताना बदनामी मात्र जिल्हा परिषदेची होत आहे, असे यतिन कदम यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या आवारात हलवावे, अशी मागणी केली. यतिन पगार यांनी या कार्यालयासाठी आपण स्वत:च्या कार्यालयाची जागा देतो, पण हे कार्यालय आधी नाशिकला स्थलांतरित करावे, अशी सूचना मांडली. अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची केळी आणि अंडी उपलब्ध होत नसल्याचा आरोप भास्कर गावित यांनी केला. तर कुपोषणावर लाखो रुपये खर्च होऊनही आदिवासी भागातील कुपोषित बालकांची संख्या वाढतच असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले. डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि सविता पवार यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यांची बांधकामे होत नसल्याकडे लक्ष वेधले. जागा मिळत नसल्यानेच अंगणवाड्यांची कामे प्रलंबित राहत असल्याचा खुलासा दीपककुमार मीना यांनी केला.
अपंग महिलेवर अन्याय
डॉ. भारती पवार यांनी, प्रशासनाने एका अपंग महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निता धनंजय पवार या महिलेबाबत थेट अपंग आयुक्तांनी दखल घेत जिल्हा परिषदेला पत्र दिल्याचे सांगितले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी या महिलेसह अन्य तीन असे चौघांवर अन्याय झाल्याची कबुली दिली. प्रवर्ग बदलल्याने त्यांच्यावर अन्याय झाला असून, त्यांना १५ दिवसांपूर्वीच सोयीचे ठिकाणी बदली देण्यात आल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ. भारती पवार यांनी केली.
नांदगाव ५६ खेडी पाणी योजनेला मंजुरीयतिन कदम यांनी नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेच्या सेसचा कोट्यवधीचा खर्च होत असताना प्रत्यक्षात वसुली लाखातच होत असल्याचा आरोप करीत या योजनेतील पाणीगळती रोखली तर जिल्हा परिषदेचा लाखोेंचा निधी वाचणार असल्याचे
सांगितले. बांधकाम सभापती मनिष पवार यांनी यासंदर्भात नांदगावला नुकतीच एक बैठक घेऊन या योजनेबाबत सरपंचांना माहिती दिल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी या योजनेची नेमकी किती गळती आहे. याचा अहवाल पुढील बैठकीस सादर करावा, असे आदेश अनिल लांडगे यांनी दिले. डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी या योजनेला पर्यायी योजना शासनाकडे मंजुरीला पाठवा, असे सांगितले. त्यावर कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नांदगाव- ५६ खेडी योजनेला पर्यायी योजना तत्वत: मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.