मालेगावी शिवसेना ठरविणार स्थायी समिती सभापती
By Admin | Updated: July 24, 2016 23:06 IST2016-07-24T23:04:46+5:302016-07-24T23:06:15+5:30
मालेगावी शिवसेना ठरविणार स्थायी समिती सभापती

मालेगावी शिवसेना ठरविणार स्थायी समिती सभापती
आझादनगर : मालेगाव महापालिकेच्या २६ जुलै मंगळवारी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होत असून, दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी समान बलाबल असल्याने लढत चुरशीची होणार आहे. विजयासाठी सदस्याला आपआपल्या तंबूत खेचण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, तर उमेदवार अबाधित राखण्यासाठी एका गटाकडून सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे.
स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. विजयासाठी नऊ सदस्यांची आवश्यकता आहे. शहरविकास आघाडीचे युनुस इसा व तिसरा (आघाडी) महाजतर्फे एजाज बेग रिंगणात आहेत. युनुस इसा यांनी गत स्थायी समिती सभापती निवडणुकीत तिसरा महाजचे मोहंमद एजाज मोहंमद वजीर व मोहंमद युसुफ अब्दुल कादीर यांना आपल्याकडे खेचून घेत काँग्रेसच्या ताहेरा शेख रशीद यांना स्थायी समिती सभापतीपदी विराजमान केले होते. याचीच परतफेड म्हणून काँग्रेसने आपले पाच सदस्यीय बल युनूस इसा यांना दिले आहेत. काँग्रेसचेच पाच व शहरविकास आघाडीचे दोन असे सात सदस्य युनुस इसांच्या पाठीशी आहेत. तिसरा महाजकडे स्वपक्षाचे पाच सदस्य असून जनता दलाचे बुलंद एकबाल व मालेगाव विकास आघाडीचे सुनील गायकवाड असे एकूण दोन सदस्य एजाज बेग यांच्या तंबूत आहेत; मात्र दोन्ही उमेदवारांना विजयासाठी सेनेच्या दोन सदस्यांवर अवलंबून रहावे लागणार आहेत. परिणामी विजयाची मदार सेनेच्या कौलावर आहे. सेनेचे दोन सदस्यांपैकी दिलीप पवार युनुस इसांच्या संपर्कात आहेत. श्निवारी राज्यमंत्री दादा भुसे शहरात दाखल झाले. त्यांनी सेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली. (वार्ताहर)