घंटागाडी कामगारांचे ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: July 17, 2014 22:02 IST2014-07-17T00:24:20+5:302014-07-17T22:02:11+5:30
घंटागाडी कामगारांचे ठिय्या आंदोलन

घंटागाडी कामगारांचे ठिय्या आंदोलन
नाशिक : वेतन मिळण्यास विलंब झाल्याने संतप्त झालेल्या पंचवटीतील घंटागाडी कामगारांनी कन्नमवार पुलाजवळ ठिय्या आंदोलन केले आणि घंटागाड्याच बाहेर काढल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली. अखेरीस आरोग्याधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून ठेकेदारास वेतन देण्यास भाग पाडल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत घंटागाडी कामगारांना वेतन देणे बंधनकारक असतानादेखील पंचवटीतील घंटागाडी ठेकेदार असलेल्या समीक्षा कन्स्ट्रक्शनच्या वतीने ते देण्यात येत नाही. गेल्या महिन्यातदेखील २० तारखेला वेतन देण्यात आले होते. हातावरचे पोट असलेल्या सुमारे शंभर कर्मचाऱ्यांचे त्यामुळे हाल झाले होते. गेल्या महिन्याचे वेतन १४ तारखेपर्यंत न मिळाल्याने श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी कन्नमवार पुलाजवळ जैविक कचरा प्रकल्प असलेल्या ठिकाणी जमून घंटागाड्या सुरू केल्या नाही आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. यासंदर्भात स्वच्छता निरीक्षकांमार्फत आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना कळविण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी ठेकेदाराच्या स्थानिक प्रतिनिधीशी चर्चा केल्यानंतर आजच वेतन जमा करण्यात येईल असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आणि साडेदहा वाजेनंतर पंचवटी भागात घंटागाड्या नेण्यात आल्या.
सदरची ठेकेदार कंपनी ठाणे येथील असून, स्थानिक पातळीवर हृषिकेश चौधरी हे काम बघतात. कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करूनही ठाणेस्थित कंपनी लक्ष देत नसल्याचे श्रमिक सेवा संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)