नाशिक : घराकडे खुन्नसने का पाहतो, याचा जाब विचारण्यास गेलेल्या दोघांवर चाकूने वार केल्याची घटना पेठरोडवरील ओम्कारनगरमध्ये घडली़ याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुप्रसाद बंगल्यामध्ये राहणारे दिनेश अण्णा वाघ व आदेश वाघ हे सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित अनिल बुनगे (रा़ ओम्कारनगर) यास आमच्या घराकडे खुन्नसने का पाहतो याचा जाब विचारण्यास गेले़ या गोष्टीचा राग येऊन संशयित बुनगे व त्याचे मित्र संदीप थेटे (रा़ मखमलाबाद), नितीन रायते (रा़ चाणक्यपुरी सोसायटी, पेठरोड) व टिल्लू (पूर्ण नाव माहिती नाही) या चौघांनी वाघ यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली़ नितीन रायते याने आदेश वाघच्या छातीवर व पाठीवर चाकूने वार करून जखमी केले़ या प्रकरणी दिनेश वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)