वळवाच्या पावसाचा शहरात शिडकावा
By Admin | Updated: May 14, 2017 01:30 IST2017-05-14T01:29:48+5:302017-05-14T01:30:37+5:30
नाशिक : हैराण झालेल्या नाशिककरांना (दि.१३) वळवाच्या पावसाचा शिडकावा झाल्याने दिलासा मिळाला.

वळवाच्या पावसाचा शहरात शिडकावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : उन्हाच्या काहिलीने गेल्या दोन महिन्यांपासून हैराण झालेल्या नाशिककरांना शनिवारी (दि.१३) वळवाच्या पावसाचा शिडकावा झाल्याने दिलासा मिळाला. संध्याकाळच्या सुमारास शहरातील विविध भागात आकाशात ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात पहिल्या पावसामुळे मातीचा सुगंध दरवळला. अनेकांनी घराबाहेर पडून पावसाचा आनंद घेतला. मात्र पावसामुळे शहरासह उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शहरातील वातावरणात दोन दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढला होता. आर्द्रता वाढल्याने नाशिककर घामाघूम झाले होते. उकाडा प्रचंड असह्य होत असल्याने रात्रीच्या वेळीदेखील नागरिकांना घरात बसणे कठीण झाले होते. अखेर आज दुपारनंतर वळवाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला; मात्र तपमानात खूप काही घट झाली नाही. शनिवारी (दि.१३) शहराचे कमाल तपमान ४० अंश इतके नोंदविले गेले तर किमान तपमान २५ अंशांवर होते. एकूणच पावसाचा शिडकावा झाला असला तरी किमान तपमानात घट होण्यास मदत होणार आहे; मात्र कमाल तपमान कमी होण्यास कितपत मदत होईल आणि लहरी निसर्ग नाशिककरांवर कशी कृपा करेल, हे सांगता येत नाही. ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाट सुरू होताच महावितरणने वीजपुरवठा खंडित केला.