वसंत बंधारा कोरडाठाक
By Admin | Updated: May 20, 2017 01:11 IST2017-05-20T01:11:23+5:302017-05-20T01:11:39+5:30
कसबे सुकेणे : बाणगंगा काठावरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत असून, गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत

वसंत बंधारा कोरडाठाक
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे सुकेणे : बाणगंगा काठावरील गावांचा पाणीप्रश्न गंभीर होत असून, गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गंगापूर धरणातून बाणगंगा नदीवरील कोरडेठाक पडलेले सर्व बंधारे भरून देण्याची जोरदार मागणी या भागातून होत आहे.
बागायतदार तालुका असलेल्या निफाडमधील विविध गावांचा घसा जून महिन्याच्या शेवटी कोरडा पडला आहे. बाणगंगा काठच्या विविध गावांना पाणीटंचाईच्या झळा पोहचल्या आहेत. बाणगंगा, कादवा, गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. गंगापूर डाव्या कालव्याच्या आवर्तनावर या भागातील बहुतांश शेती अवलंबून आहे. सध्या गंगापूर डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सुरू आहे. बाणगंगा काठच्या दीक्षी, थेरगाव, जिव्हाळे , दात्याणे, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे या गावांचा पाणीपुरवठा बाणगंगा नदीवर आधारित आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिलासादायक चित्र असले तरी मात्र बाणगंगा काठच्या गावांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कसबे सुकेणे या मोठ्या गावाला पिण्याचे पाणी पोहचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गंगापूरमधून बाणगंगेत पाणी सोडावे, अशी मागणी कसबे सुकेणेचे सरपंच छगन जाधव, उपसरपंच परेश भार्गवे, मौजे सुकेणेच्या सरपंच सुरेखा विलास गडाख, उपसरपंच नंदकुमार हंडोरे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.