क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

By Admin | Updated: May 13, 2017 02:16 IST2017-05-13T02:15:37+5:302017-05-13T02:16:31+5:30

नाशिक : निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचे शुक्रवारी निधन झाले.

Sports psychiatrist Bhishmaraj Bam passed away | क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ज्येष्ठ क्रीडामानसोपचार तज्ज्ञ आणि राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक भीष्मराज बाम (७९) यांचे शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन बहिणी असा परिवार आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजेपासून महात्मानगर मैदानालगतच्या हॉलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मानसोपचारातील भीष्म अशी उपाधी लाभलेले भीष्मराज बाम हे एका कार्यक्रमात योगविद्येसंदर्भात व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या महात्मानगर येथील निवासस्थानी गर्दी केली होती. क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून अवघ्या देशाला परिचित असलेल्या
बाम यांनी क्रिकेटमधील राहुल द्रविडसह आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनाच नव्हे तर नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच गीत सेठी, धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिकदृष्ट्या एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मानसिक मार्गदर्शन करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत २०११-१२ या वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. भारतातील क्रीडापटूंना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे शिवधनुष्य बाम यांनी उचलले होते. बाम यांनी शासकीय खात्यातील सेवानिवृत्तीनंतर भारतीय योगशास्त्राचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यातून क्रीडामानसोपचार या विषयावर प्रभुत्व मिळविले. ‘तुमचा तुमच्यावर विश्वास हवा, स्वत:वर विश्वास असल्यास काहीही शक्य आहे’, असे ते नेहमीच सांगत असत. बाम यांनी राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या नेमबाजीसंघासह मुंबई रणजी संघाचे मानसोपचार सल्लागार म्हणून काम पाहिले होते. विजयाचे मानसशास्त्र, मार्ग यशाचा, संधीचे सोने करण्याची इच्छाशक्ती, मना सज्जना आणि विनिंग हॅबिट ही त्यांची पुस्तकेही गाजली होती. विनिंग हॅबिट्स या पुस्तकाचा बारा भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे.

Web Title: Sports psychiatrist Bhishmaraj Bam passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.