दसक येथे उभारणार क्रीडासंकुल
By Admin | Updated: January 21, 2016 22:51 IST2016-01-21T22:49:44+5:302016-01-21T22:51:48+5:30
हेमंत गोडसे : केंद्र सरकारचा पावणे सात कोटींचा निधी मंजूर

दसक येथे उभारणार क्रीडासंकुल
नाशिक : केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने प्रथमच एखाद्या क्रीडासंकुलासाठी थेट निधी मिळणार आहे. नाशिकला दसक येथे जागतिक दर्जाचे क्रीडासंकुल उभारले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सहा कोटींचा निधी मंजूर केला असून, महापालिकेला त्यासाठी ७५ लाखांची तरतूद करावी लागणार आहे.
दसकला प्रभाग ३२ येथे २४ हजार चौरसमीटर क्षेत्रावर हे क्रीडासंकुल साकारले जाईल. त्यासाठी केंद्र सरकारने सहा कोटींचा निधी मंजूर केला असून तसे पत्र खासदार हेमंत गोडसे यांना केंद्र सरकारने पाठविले आहे. केंद्र सरकारच्या शहरी क्रीडासंकुल योजनेतून (यूएसआयएस) शहरी भागात क्रीडासंकुल उभारण्याची योजना आहे. या योजनेंतर्गतच शहरातील सायखेडा रोडवरील आढावनगर भागात प्रभाग ३२ मध्ये हे क्रीडासंकुल साकारणार आहे. खासदार हेमंत गोडसे व नगरसेवक शैलेश ढगे यांच्या एकत्रित प्रयत्नातून सर्व क्रमांक ४९, ६२ व ६८ या जागेवर प्रस्तावित क्रीडासंकुल उभे राहणार आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रस्तावाला मंजुरी मिळाली. क्रीडासंकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, क्रीडासंकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षक व कर्मचारी भरती केली जाणार आहे. (प्रतिनिधी)