बाम यांच्या नावाने क्रीडा अकॅडमी
By Admin | Updated: May 15, 2017 00:54 IST2017-05-15T00:54:19+5:302017-05-15T00:54:59+5:30
नाशिक : क्रीडाक्षेत्राचे मार्गदर्शक आणि नाशिकचे भूषण असलेले क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हयातीत त्यांच्या स्वप्नातील क्रीडाक्षेत्रासाठी फारसे करता आले नाही

बाम यांच्या नावाने क्रीडा अकॅडमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : क्रीडाक्षेत्राचे मार्गदर्शक आणि नाशिकचे भूषण असलेले क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हयातीत त्यांच्या स्वप्नातील क्रीडाक्षेत्रासाठी फारसे करता आले नाही. आता त्यांच्या नावाने नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा अकॅडमी सुरू व्हावी यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी श्रद्धांजली सभेत जाहीर केले. यावेळी त्यांनी शासनाकडून बाम यांचा मरणोत्तर गौरव व्हावा, यासाठी आपण आग्रही असल्याचेही सांगितले.
महात्मानगर येथील समाजमंदिर हॉल येथे भीष्मराज बाम यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करताना अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी फरांदे म्हणाल्या, शासनाचे क्रीडा धोरण लक्षवेधी असावे, असा त्यांचा आग्रह होता. यासाठी त्यांनी आपणाला बोलावून क्रीडा धोरणाविषयी चर्चा केली होती. शासनाने काही ठराविक खेळाकडे लक्ष केंद्रित केले तरी देशाला मेडल मिळू शकतील. यासाठीचा एक मसुदाही त्यांनी तयार केला होता. तो आपण क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे दिला आहे. बाम यांचे खेळावर विशेष प्रेम होते. खेळामुळे केवळ खेळाडूच घडतो असे नव्हे तर सुजान नागरिकही घडतो, असे त्यांचे विचार होते. खेळ हे असे एकमेव क्षेत्र आहे की ज्यामुळे परदेशात देशाचे राष्ट्रगीत आणि झेंडाही फडकतो, असे म्हणणारे बाम सर महाराष्ट्राचे भूषण होते, अशा शब्दात आमदार फरांदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
नेमबाज श्रद्धा नलमवार यांनी, बाम सरांनी अनेक खेळाडू घडविले आणि मानसिकता सक्षम केल्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली. सातपूर येथील शूटिंग रेंजला बाम सरांचे नाव देण्यात यावे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. धावपटू मोनिका आथरे हिने सरांचे नेहमी सर्वांनाच मार्गदर्शन होते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या रूपाने ते नेहमी आपल्यात राहतील. त्यांचे शब्द कायम प्रेरणा देत राहतील, असे सांगितले. शीतल सोनवणे हिने सरांचे मार्गदर्शन केवळ क्रीडा क्षेत्रासाठीच नव्हते तर त्यांनी मानसिकदृष्ट्या खचलेल्या अनेकांना उभारी दिली आहे. मानसिक सरावासाठी त्यांच्या कोणत्याही सीमारेषा नव्हत्या. ते सर्वांचे होते, अशी भावना व्यक्त केली.
स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी बाम महात्मानगरचे असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान होता. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या सरांच्या जाण्याने नाशिकची मोठी हानी झाल्याचे ते म्हणाले. कॉम्रेड श्रीधर देशपांडे म्हणाले, बाम सर यांनी आयुष्यभर क्रीडाक्षेत्रावर भरभरून प्रेम केले. त्यांनी क्रीडाक्षेत्राला मोठी ताकद दिली. बाम सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आणि माणसांवर प्रेम करणारे मानसोपचारतज्ज्ञ होते, असे म्हटले. यावेळी जयप्रकाश जातेगावकर, हेमलता पाटील, सुहास फरांदे, श्रीधर व्यवहारे, प्रियंका घाटे, नारायण देवरे, प्रमोद पुराणिक, सचिन जोशी, मनोहर देशपांडे, देवदत्त जोशी, जीतूभाई ठक्कर, मनोज चौधरी, नागेश काळे, विक्रम कदम आदिंनी श्रद्धांजली अर्पण केली. सूत्रसंचालन धनंजय बेळे यांनी केले.