धावत्या ट्रकने उड्डाणपुलावर घेतला पेट
By Admin | Updated: March 17, 2017 01:13 IST2017-03-17T01:13:44+5:302017-03-17T01:13:58+5:30
‘बर्निंग ट्रक’ : अग्निशामक दलाच्या जवानांची तत्परता

धावत्या ट्रकने उड्डाणपुलावर घेतला पेट
सिडको : वेळ सुमारे सकाळी सात वाजेची. दिवसाची वाहतूक सुरळीत महामार्गावरून सुरू होती. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या ट्रकने अचानक राणेनगरजवळ उड्डाणपुलावर पेट घेतला. धावता ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे बघून परिसरातील नागरिकांमध्येही घबराट पसरली होती.
राणेनगर येथील उड्डाणपुलावरून ट्रक नाशिकच्या दिशेने येत असताना सकाळी सात वाजेच्या सुमारास ट्रकमधून अचानक धूर येऊ लागला. चालक साव यांच्या हे लक्षात येताच त्यांनी ट्रकची गती हळू करीत ते ट्रकमधून बाहेर पडले. यानंतर काही वेळातच ट्रकने पेट घेतला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबईहून नाशिककडे येणारा ट्रक (एमएच ४० वाय ४४६७) उड्डाणपुलावरून राणेनगर येथे आला असता अचानकपणे ट्रकच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याचे ट्रकचालक मनोज किशोर साव यांच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने ट्रक उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्याजवळ उभा केला.
या घटनेची माहिती परिसरातील सामाजिक कार्यकते राजू कदम यांनी अंबड पोलीस स्टेशनला व अग्निशामक दलास कळविले. यानंतर अग्निशमक दलाच्या एका बंबाच्या साह्याने काही वेळातच आग विझविण्यात आली.
अग्निशामक दलाचे मंगेश पिंपळे, सिद्धार्थ भालेराव, अनिल गांगुर्डे, खोडे, रविकांत लाड आदिंनी आग विझविली. (वार्ताहर)