दत्त जन्मोत्सवाच्या तयारीला वेग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:56 PM2019-12-10T23:56:18+5:302019-12-11T00:27:06+5:30

चराचरातील प्रत्येक जिवाचे गुरू असलेल्या भगवान दत्तात्रेयाच्या अर्थात दत्तगुरुंचा जन्मोत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने महानगरातील सर्व दत्त मंदिरांमध्ये जन्मोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे.

 Speed up the preparation for Dutt's birthday! | दत्त जन्मोत्सवाच्या तयारीला वेग !

दत्त जन्मोत्सवाच्या तयारीला वेग !

Next

नाशिक : चराचरातील प्रत्येक जिवाचे गुरू असलेल्या भगवान दत्तात्रेयाच्या अर्थात दत्तगुरुंचा जन्मोत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने महानगरातील सर्व दत्त मंदिरांमध्ये जन्मोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. दत्त संप्रदायातील भाविकांकडून महानगरातील आपापल्या परिसरातील दत्तमंदिरांमध्ये त्यानिमित्ताने गुरूचरित्र पारायण, दत्तयागाच्या आयोजनासह मंदिर सुशोभिकरण आणि रोषणाईसह अन्य कामांना वेग देण्यात आला आहे.
महानगरातील होळकर पुलाला लागून असलेल्या एकमुखी दत्तमंदिराला तर सोमवारपासूनच फुलांच्या माळांची आरास करण्यास प्रारंभ करण्यात आला. महानगराच्या आसपासच्या भागात असलेल्या दत्त मंदिरांमध्ये तर भागवत सप्ताहदेखील सुरू आहेत. तसेच महानगरातील सर्व भागांमधील श्री स्वामी समर्थ मंदिर, दत्त मंदिररोडवरील घैसास दत्तमंदिर, भक्तिधाम मंदिर, शास्त्रीपथचे दत्तमंदिर, माडसांगवीचे श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर, देवळाली गाव आठवडे बाजारातील श्री दत्त महाराज मंदिरात जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने तयारीला वेग देण्यात आला आहे.
काही मंदिरांवर सोमवारपासूनच रोषणाई करण्यात आली आहे.
भगवान दत्तगुरुंच्या जन्मोत्सवानिमित्त महानगरात असलेल्या श्री गोंदवलेकर महाराज मंदिर, ढेकणेकाका आश्रम, गुरुमाउलींची स्वामी समर्थ मंदिरे तसेच अन्य गुरुंच्या आश्रमांचीही भक्तपरिवाराच्या वतीने सजावट केली जात आहे.
मंदिरे सजली
महानगरातील औदुंबरनगर परिसरातील दत्तमंदिर, शिंगाडा तलावाचे दत्तमंदिर, गंगापूररोडचे दत्तमंदिर, इंदिरानगर परिसरातील दत्तमंदिर, गणेशनगरमधील मंदिर, जनार्दन स्वामी मठ, शंकर महाराज भक्तपरिवाराचे कालिका मंदिराजवळील दत्तमंदिर, जिल्हा परिषद कॉलनीतील गुरुदत्त मंदिर, एसटी वर्कशॉप येथील दत्तमंदिर यासह महानगरातील विविध दत्तमंदिरांच्या सजावटींवर अंतिम हात फिरवण्यासह धार्मिक उपक्रमांच्या आयोजनाला वेग देण्यात आला आहे.

Web Title:  Speed up the preparation for Dutt's birthday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.