कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांसाठी विशेष रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:06+5:302021-05-10T04:14:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने लहान मुलांवर कोरोनाचे उपचार करण्यासाठी १०० बेडच्या रुग्णालयाचे नियोजन सुरू करण्यात येत ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांसाठी विशेष रुग्णालय
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने लहान मुलांवर कोरोनाचे उपचार करण्यासाठी १०० बेडच्या रुग्णालयाचे नियोजन सुरू करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत देखील विविध पातळीवर काम करण्यात येत आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने कोविड सेंटर आणि मनपा रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध सेवा- सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. राज्य शासनाने याबाबत महापालिकांना नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे. मात्र, त्या आजाराने लहान मुले प्रभावित झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.
बिटको रुग्णालयात टप्प्याटप्प्याने १०० बेडची व्यवस्था महापालिकेच्या वतीने केली जाणार असून त्यास अनुषंगिक साधनसामग्री व मनुष्यबळाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना सूचना दिलेल्या असून त्यास गती देऊन कोरोनाग्रस्त बालकांसाठी रुग्ण सेवा देण्यासाठी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.