सहा लाख हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या
By Admin | Updated: August 6, 2016 01:29 IST2016-08-06T01:29:33+5:302016-08-06T01:29:44+5:30
दमदार पाऊस : मका, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

सहा लाख हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या
नाशिक : जुलैमध्ये संततधार असलेल्या पावसाने आॅगस्टच्या सुरुवातीलाच पुन्हा दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. खरिपाच्या सरासरी लागवडीखालील एकूण सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी पाच लाख ८२ हजार ७१६ हेक्टर (८९.३० टक्के) क्षेत्रावरील पेरण्या आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्या आहेत.
खरिपाच्या भात लागवडीचे क्षेत्र ६६ हजार ७०० हेक्टर क्षेत्रापैकी ६१ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. खरीप ज्वारीच्या तीन हजार ९९० हेक्टर क्षेत्रापैकी ६३३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप बाजरीचे एक लाख ६० हजार २०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी एक लाख २४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. भूईमूगाचे सरासरी क्षेत्र ३१ हजार ३०० हेक्टर असून त्यापैकी २३ हजार १२ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.
सोयाबीनचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ५७ हजार हेक्टर असून त्यापैकी ५६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. येत्या आठवडाभरात खरिपाच्या शंभर टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दमदार पावसाने खरिपाच्या पिकांना चांगलाच आधार दिला आहे. आता काही काळ पावसाने उघडीप घेतल्यास पिकांची जोमाने वाढ होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे; मात्र अशीच संततधार कायम राहिल्यास त्याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची चिन्हे आहे. (प्रतिनिधी)