अमरधाममध्ये पुरुषोत्तम योगाची ध्वनिफीत

By Admin | Updated: July 15, 2015 23:59 IST2015-07-15T23:59:27+5:302015-07-15T23:59:57+5:30

‘झेप’चा उपक्रम : गीतेतील पंधरावा अध्याय सांगणार जीवनाचे सार

Soundtrack of Purshottam Yoga in Amardhama | अमरधाममध्ये पुरुषोत्तम योगाची ध्वनिफीत

अमरधाममध्ये पुरुषोत्तम योगाची ध्वनिफीत

नाशिक : शहरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसमयी श्रीमद्भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायातून मांडण्यात आलेले जीवनाचे सार कानावर पडणार असून, त्यासाठी झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने खास सुलभ मराठी भाषेतील अर्थवाही अशी ध्वनिफीत तयार केली आहे. या ध्वनिफितीच्या श्रवणाने शोकाकुल परिवाराच्या दु:खाचा भार हलका होण्यास मदत होईल. तसेच आत्म्याच्या चिरशांतीसाठीही प्रार्थनेच्या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गुरुमित बग्गा यांनी दिली. मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य आहे आणि मृत्यू कुणालाही टाळता आलेला नाही. स्मशानभूमींमध्ये हिंदू धर्माच्या रीतीरिवाजानुसार मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारप्रसंगी गीतेतील पंधराव्या अध्यायाचे अर्थात पुरुषोत्तम योगाचे सामूहिक पठण करण्याची प्रथा आहे.१५व्या अध्यायात जीवनाचे सार सांगितलेले आहे. अध्यायाची महती लक्षात घेता झेप सांस्कृतिक मंडळाने सदर अध्यायाचा सुलभ मराठी अनुवाद करत त्याची ध्वनिफीत शहरातील स्मशानभूमींमध्ये ऐकवण्याचा संकल्प सोडला आणि तो पुढील आठवड्यात तडीस जात आहे. मंडळाने मराठी भाषेतून अर्थ उलगडून दाखविणारी ही ध्वनिफीत तयार केली असून, नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ती शहरातील सर्व अमरधाममध्ये पुरेशी ध्वनीव्यवस्था बसवून त्याचे ध्वनीमुद्रण मृत व्यक्तींच्या नातेवाइकांच्या इच्छेनुसार मोफत ऐकविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक व पंचवटी अमरधाममध्ये येत्या आठ दिवसांत ही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी झेप सांस्कृतिक मंडळ स्वत: आर्थिक भार उचलणार आहे. या ध्वनिफितीच्या श्रवणामुळे शोकाकुल परिवाराचे दु:ख हलके होण्यास मदत होणार आहेच, शिवाय जीवात्म्याच्या मोक्षप्राप्तीसाठीही प्रार्थना होणार आहे. समाजाभिमुख असा हा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रथमच होत असून, सदर ध्वनिफीत महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींसह स्थानिक स्वराज्य संस्थांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे बग्गा यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पटेल, रवि कुलकर्णी, राजेश खांदवे व अशोक दोंदे तसेच अ‍ॅड. अजय निकम यांचे सहकार्य लाभल्याचेही बग्गा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Soundtrack of Purshottam Yoga in Amardhama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.