घुमला आवाज ‘विघ्नहरण’चा!

By Admin | Updated: January 10, 2016 23:54 IST2016-01-10T23:54:18+5:302016-01-10T23:54:59+5:30

ढोलवादन स्पर्धा : ‘तालरुद्र’ व ‘माउली’ला द्वितीय पारितोषिक

The sound of the voice is 'Vighnaharan'! | घुमला आवाज ‘विघ्नहरण’चा!

घुमला आवाज ‘विघ्नहरण’चा!

नाशिक : हवेत फडकणारे भगवे ध्वज, आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा गगनभेदी आवाज, त्याला शिट्या-टाळ्यांची मिळालेली साथ अशा जल्लोषपूर्ण वातावरणात ढोल-ताशावादन स्पर्धा आज यशवंतराव महाराज पटांगणावर पार पडली आणि अवघा गोदाघाट दुमदुमून गेला. या स्पर्धेत विघ्नहरण पथकाने प्रथम क्रमांक पटकावला, तर तालरुद्र पथक व माउली प्रतिष्ठानला द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय व मुंबईच्या ‘मी मुलुंडकर’ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशावादन स्पर्धेची प्राथमिक फेरी येथील गोदाघाटावर आज सायंकाळी रंगली. स्पर्धेत श्री साक्षी नाशिक, तालरुद्र, माउली, विघ्नहरण, शिवतांडव, वरदविनायक या सहा ढोलपथकांनी सहभाग घेतला. प्रत्येक पथकाला वादनासाठी पंधरा मिनिटे देण्यात आली. नंतर पुन्हा दहा मिनिटांची दुसरी फेरी घेण्यात आली. वादनातील शिस्तबद्धता व वेशभूषेच्या निकषावर परीक्षक सुधीर आंबोले (मुंबई) यांनी प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर केला. मी मुलुंडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बाणावली व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. प्रथम विजेत्याला २५ हजार, द्वितीय विजेत्यांना पंधरा हजार रुपये (विभागून) प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेमुळे गोदाघाट अक्षरश: दुमदुमून गेला होता. केशरी रंगाचे फेटे, पारंपरिक वेशभूषा परिधान करून ढोलपथकांनी केलेल्या वादनामुळे उपस्थितांतही जल्लोष संचारला. स्पर्धा पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. ढोलपथकांत लहान मुले, महिलांचाही सहभाग होता. यावेळी राजेश जाधव, मीना वाघ, डॉ. प्रशांत वाघ, रवि साळवे, अजय तारगे आदिंनी नियोजन केले.

Web Title: The sound of the voice is 'Vighnaharan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.