अनेकविध फुलांची नाशिककरांना मोहिनी
By Admin | Updated: February 4, 2017 23:43 IST2017-02-04T23:42:40+5:302017-02-04T23:43:03+5:30
आज होणार पुष्पप्रदर्शनाचा समारोप

अनेकविध फुलांची नाशिककरांना मोहिनी
नाशिक : अॅझेलिया, ग्लॅडिअस, कॅनन किलस, आॅरनामेंटन या आणि अशा वीस हजारांहून अधिक फुलांचे प्रदर्शन नाशिकरोड येथील नाशिक्लब हॉटेलमध्ये भरविण्यात आले आहे. केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या पुष्पप्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. वर्षभर फुले देणारी झाडे तसेच मोसमी फुलांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. या पुष्पप्रदर्शनात गुलाबाचे १००, पेटोनियाचे ३२, शेवंतीचे ८ तर एडोनिअम या वाळवंटी पुष्पाच्या १८० प्रजाती या प्रदर्शनात बघायला मिळतात. या प्रदर्शनाअंतर्गत तप्त सूर्यात फुलणारे गॅझेनिया, आफ्रिकन रोझ आणि ब्राझिलीयन बटरफ्लाय ही पुष्पे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आतापर्यंत या प्रदर्शनाला पाच ते सात हजार नागरिकांनी तर नऊ शाळांतील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी भेट दिल्याची माहिती संयोजक संदेश सारंग यांनी दिली. कुठल्याही नर्सरीतील झाडांचा या प्रदर्शनात समावेश न करता हॉटेलच्याच आवारात लागवड करण्यात आलेल्या झाडांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. मोसमी झाडांची साधारण तीन महिन्यांपूर्वी तर इतर झाडांची गेल्यावर्षी लागवड करण्यात आली आहे. या पुष्पप्रदर्शनांतर्गत गुलाब पुष्प, गुलाब पुष्पा व्यतिरिक्त इतर फुले, शोभिवंत झाडे, पुष्प रांगोळी आणि गार्डन प्रतिकृती या पाच गटात स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत डॉ. रुक्मिणी कराड (फुलझाडे), अरुण पाटील (गार्डन प्रतिकृती), डॉ प्राजक्ता भामरे (गार्डन प्रतिकृती) आणि संगीता पोरवाल (टेरारिअम) या विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रविवारी (दि. ५) पुष्पप्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)