ओझर-पिंपळगावला लवकरच उड्डाणपूल
By Admin | Updated: November 16, 2015 22:37 IST2015-11-16T22:35:46+5:302015-11-16T22:37:02+5:30
प्रस्ताव केंद्राकडे : सव्वाशे कोटींचा खर्च अपेक्षित

ओझर-पिंपळगावला लवकरच उड्डाणपूल
नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांचा विरोध व भूसंपादनाच्या वादात अडकलेले मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील ओझर व पिंपळगाव बसवंत येथील उड्डाणपुलाचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांनी केलेल्या मागणीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हिरवा कंदील दर्शविल्यामुळे नवीन वर्षात दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील दुसऱ्या टप्प्यात ओझर गावातून रुंदीकरणाचा मार्ग जात असल्यामुळे प्रारंभी चौपदरीकरणासाठी जागा संपादित करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे काम सुरू होण्यास विलंब झाला होता, त्यानंतर मात्र त्यांचा विरोध बाजूला सारून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले, परंतु या मार्गावरील रहदारीचा तसेच दोन्ही बाजूस गावाचा विस्तारीकरण झालेला असल्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण करण्याऐवजी खंडेराव महाराज मंदिरापासून उड्डाणपूल केला जावा, अशी मागणी करून ग्रामस्थांनी काम बंद पाडले, तेव्हापासून महामार्गावर सुमारे दोनशे ते तीनशे मीटर अंतराचे चौपदरीकरण रखडले असून, ग्रामस्थांची उड्डाणपुलाची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील मुख्यालयापर्यंत पोहोचविण्यात आली. दरम्यान, रस्त्याचे काम रखडल्याने या ठिकाणी कायमच वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले. एकीकडे याच रस्त्यावर टोलची आकारणी केली जात असताना दुसरीकडे रस्त्याची दुर्दशा पाहून वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशीच परिस्थिती पिंपळगाव बसवंत येथे असून, तेथेही उड्डाणपुलाच्या मागणीसाठी जवळपास तीनशे मीटर रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दोन्ही ठिकाणच्या उड्डापुलाचा प्रस्ताव दिल्लीच्या मुख्यालयी पाठविला असून, ओझरच्या पुलासाठी सुमारे शंभर कोटी, तर पिंपळगावसाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही ठिकाणच्या पुलाच्या नकाशालाही मंजुरी मिळून पहिल्या प्रस्तावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव पुन्हा प्राधिकरणाच्या मुख्यालयी पाठविण्यात आला आहे. येत्या महिन्यात उड्डाणपुलाचे काम सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.