खुनाच्या आरोपीसह सोनसाखळी चोरास अटक
By Admin | Updated: July 1, 2017 01:10 IST2017-07-01T01:10:15+5:302017-07-01T01:10:28+5:30
येवला : वर्षभरापूर्वी पत्नीला रॉकेल ओतून जाळून फरार झालेल्या संशयिताला वणी येथून, तर वर्षभरापूर्वीच सोन्याची पोत लांबवणाऱ्या चोरट्याला येवला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खुनाच्या आरोपीसह सोनसाखळी चोरास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : वर्षभरापूर्वी पत्नीला रॉकेल ओतून जाळून फरार झालेल्या संशयिताला वणी येथून, तर वर्षभरापूर्वीच पाच तोळ्यांची सोन्याची पोत लांबवणाऱ्या चोरट्याला येवला शहर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
शहरातील शनि पटांगण परिसरात राहणाऱ्या मयत सुनीता सुनील जाधव या महिलेला पती सुनील कारभारी जाधव याने ५ आॅगस्ट २०१६ रोजी रॉकेल ओतून जाळले होते. या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेनंतर सुनील जाधव फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांच्याकडे सुरू होता. निंबाळकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा फरार झालेला संशयित वणी येथे लपून बसलेला असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ.राहुल खाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विश्वासराव निंबाळकर यांनी बुधवारी दिवसभर सापळा रचून संशयित आरोपी सुनील कारभारी जाधव यास ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता त्यास २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दि. २५ सप्टेंबर २०१६ रोजी शहरातील बदापूर रोड, वल्लभनगर परिसरातील रहिवासी असलेल्या मंगला प्रफुल्ल लोणारी या सकाळी ८.१५ वाजेच्या दरम्यान फिरायला गेलेल्या असताना त्यांची पाच तोळे सोन्याची पोत मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी खेचून पळवली होती. तपासादरम्यान टोलनाक्यावरील फुटेजमध्ये संशयित दिसून आले. अधिक तपासामध्ये सदरचे चोरटे श्रीरामपूर येथील असून, त्याचे नाव मुस्लीम यासीन इराणी असे असल्याचे समजले. संशयित मुस्लीम इराणी यास सपोनि निंबाळकर व राकेश होलगडे यांनी अटक करून त्याच्याकडून पाच तोळ्याची सोन्याची पोत हस्तगत केली.