सोमेश्वर पर्यटनस्थळाचाही होणार कायापालट
By Admin | Updated: May 15, 2017 01:11 IST2017-05-15T01:10:43+5:302017-05-15T01:11:43+5:30
सातपूर : ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ ही टॅग लाइन घेऊन पर्यटनाचा सर्वत्र विकास साधला जाईल, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

सोमेश्वर पर्यटनस्थळाचाही होणार कायापालट
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : राज्यातील विविध भागांच्या पर्यटन विकासासाठी ७० कोटींची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. यापूढे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ ही टॅग लाइन घेऊन पर्यटनाचा सर्वत्र विकास साधला जाईल, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात पर्यटन विकासासाठीच्या योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या पर्यटनाबाबत व्यापक योजना असून, आगामी काळात पर्यटनाला चालना आणि नाशिकचा विकास उद्दिष्ट ठेवून पर्यटनाला चालना देण्यात येणार असल्याचे रावल म्हणाले.
रावल यांनी पुढे सांगितले की, सोमेश्वरच्या विकासापाठोपाठ शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामे करावयाची आहेत. शहर सुंदर ठेवण्यासाठी व येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आदरातिथ्य करण्याची सवय जोपासल्यास राज्यात सर्वांत लोकिप्रय पर्यटनस्थळ म्हणून नाशिक पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जलसंधारण व राज शिष्टाचारमंत्री राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार सीमा हिरे यांनी केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, सुरेश पाटील, नगरसेवक शशिकांत जाधव, उद्धव निमसे, योगेश हिरे, माधुरी बोलकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी नायडू, विजय साने, आदिंसह नागरिक उपस्थित होते.