सोमेश्वर धबधबा खळाळला
By Admin | Updated: February 20, 2017 00:45 IST2017-02-20T00:45:24+5:302017-02-20T00:45:35+5:30
पर्यटकांची गर्दी : गंगापूर धरणातून विसर्ग

सोमेश्वर धबधबा खळाळला
नाशिक : एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रावर होणाऱ्या विद्युत निर्मितीसाठी गंगापूर धरणातून रविवारी (दि.१९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पाचशे क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. यामुळे नाशिककरांच्या पसंतीचा सोमेश्वर धबधबा खळाळला. पावसाळा संपल्यानंतर सुमारे चार महिन्यांपासून सोमेश्वर धबधबा कोरडाठाक पडला होता. तसेच गोदापात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आनंदवलीपासून घारपुरे घाटापर्यंत नदीपात्राच्या पाण्याची पातळी कमालीची घसरली होती. यामुळे रामकुंड, टाळकुटेश्वर, रोकडोबा पटांगणाजवळ नदीपात्रात गाळ साचून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. दुपारी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सोमेश्वर धबधबा वाहू लागला. धबधब्याचे छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने नाशिककरांनी रविवारची रम्य संध्याकाळ सोमेश्वर धबधब्यावर घालविली. तरुण-तरुणींनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.