समाजाने तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावे
By Admin | Updated: October 2, 2015 23:54 IST2015-10-02T23:54:22+5:302015-10-02T23:54:43+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : वसंतराव कर्डिले यांचा अमृतमहोत्सव

समाजाने तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावे
नाशिक : अलीकडच्या काळात तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या तरुणांनाच नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने, समाजाने उच्च शिक्षण घेण्याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ व्हायला हवे, असे प्रतिपादन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे शहर-जिल्हा तेली समाज व महासभा यांच्यावतीने आयोजित प्रा. वसंतराव कर्डिले यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, प्रा. वसंत कर्डिले, शकुंतला कर्डिले, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, शिरीष चौधरी, पुण्याचे उपमहापौर आबा बागुल, त्र्यंबक नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष कदम, माजी महापौर अॅड. यतीन वाघ, शिक्षण सभापती भरत चौधरी, स्वागताध्यक्ष गजानन शेलार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, तेली समाजाची स्थिती बिकट आहे. समाजातील तरुण अजूनही रोजगाराच्या शोधात आहे. परंतु हल्ली तांत्रिक शिक्षणाला प्राधान्य दिले जात असल्याने तरुणांनी त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. यावेळी त्यांनी प्रा. वसंतराव कर्डिले यांच्या कार्याचे कौतुक करत समाजातील प्रत्येकाने त्यांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचेही सांगितले. खासदार तडस यांनी, मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसण्याची संधी केवळ समाजानेच दिली असल्याने, मी जन्मभर हे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर पुरस्काराला उत्तर देताना प्रा. वसंतराव कर्डिले यांनी, खडतर आयुष्य जगत असताना जिद्दीने यामधून वाट शोधली. तसेच संपूर्ण जीवन समाजाच्या कार्यासाठी वेचले असल्याचे सांगितले. यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व श्रीगणेशाची प्रतिकृती असलेली वीणा देऊन प्रा. कर्डिले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच ‘वसंतोत्सव’ या गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रांतिक तैलीक महासभा या नामसूचीचे प्रकाशन व वधू-वर सूची.कॉम या संकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)