सोसायटीधारकांनो, आता घ्या भटके कुत्रे दत्तक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:42 IST2017-08-11T23:56:56+5:302017-08-12T00:42:01+5:30
महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम राबवूनही त्याचा परिणाम जाणवत नसताना आता या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यापेक्षा सोसायटीधारकांनाच ते दत्तक घेऊन सांभाळा, असा अजब सल्ला सनियंंत्रण समितीच्या अशासकीय सदस्याने दिला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त नागरिकांची ही कुचेष्टा चालवली आहे काय? असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.

सोसायटीधारकांनो, आता घ्या भटके कुत्रे दत्तक !
नाशिक : महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम राबवूनही त्याचा परिणाम जाणवत नसताना आता या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यापेक्षा सोसायटीधारकांनाच ते दत्तक घेऊन सांभाळा, असा अजब सल्ला सनियंंत्रण समितीच्या अशासकीय सदस्याने दिला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त नागरिकांची ही कुचेष्टा चालवली आहे काय? असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरूच असून, नागरिकांना चावा घेण्याचे प्रकार वाढतच आहे. यापूर्वी अशाच त्रासामुळे महापालिकेने श्वान निर्बीजीकरण करण्यास प्रारंभ केला. परंतु २००७ पासून आजपर्यंत शेकडो कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचे दावे महापालिका करीत असते. परंतु त्यानंतरही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की पालिकेच्या कामावरच शंका घेतली जाते. असे असताना निर्बीजीकरणांतर्गतच महापालिकेने नियुक्त केलेल्या सनियंत्रण समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासनाच्या पशुसंवर्धन खात्याचे उपआयुक्त, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे तसेच शरण्या संस्थेच्या शरण्या शेट्टी तसेच प्राणिमित्र ऋषीकेश नाझरे आदी उपस्थित होते. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी नाझरे यांनी परिसरातील अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावर जागा असते, तेथे भटके कुत्रे सांभाळावेत यासाठी नाझरे यांनी आवाहन केले. निर्बीजीकरण केल्यानंतर कुत्र्यांच्या कानांना ‘व्ही’ अशी खूण केली जाते. परंतु ती स्पष्ट दिसत नसल्याने निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टे बांधावे, त्यासाठी महापालिकेकडे तरतूद नसल्यास उद्योगधंद्यांच्या सामाजिक दायित्व निधी मिळवून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.