सामाजिक कार्यकर्त्या रूपाताई साळवे यांचे निधन
By Admin | Updated: September 13, 2016 01:36 IST2016-09-13T01:36:06+5:302016-09-13T01:36:33+5:30
सामाजिक कार्यकर्त्या रूपाताई साळवे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या रूपाताई साळवे यांचे निधन
नाशिक : गीताई कन्या छात्रालयाच्या संस्थापक आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मानसकन्या रूपाताई काळूजी साळवे (७५) यांचे रविवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. रूपाताई यांनी वसतिगृहातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चळवळीतील कार्यकर्ते आणि आप्तेष्टांनी वसतिगृहात धाव घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सक्रिय राहिलेल्या रूपाताई या दादासाहेब गायकवाड यांच्या मानसकन्या होत्या. रूपातार्इंनी अनेक सामाजिक चळवळीत सहभाग घेतला होता. विशेषत: समाजातील वंचित मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात त्या काही वर्ष अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. तेथे राहूनच त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी म्हसरूळ येथे १९८५ मध्ये गीताई गायकवाड यांच्या नावाने गीताई कन्या छात्रालय सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या आंबेडकर चळवळीच्या त्या निकटच्या साक्षीदार होत्या. त्यांनी प्रत्यक्ष चळवळीत सक्रिय सहभागदेखील घेतला. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी भरीव कार्य केले. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनींनी गीताई छात्रालयात जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. रविवारी रात्री दहा वाजता पंचवटी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.