प्रोत्साहनासाठी सोशल माध्यम आघाडीवर
By Admin | Updated: February 22, 2017 01:32 IST2017-02-22T01:32:02+5:302017-02-22T01:32:16+5:30
नोटा नको, कधीही बदलल्या जातील : नगरसेवक निवडताय, जावई नाही

प्रोत्साहनासाठी सोशल माध्यम आघाडीवर
नाशिक : जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक होत असून, मतदारांनी लोकशाही जागृत ठेवण्याबरोबरच सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांना सोशल माध्यमानेही मंगळवारी जोरदार हातभार लावला. मतदारांमध्ये मतदान जागृतीसाठी कधी बोचरी टीका, तर कुठे आपल्या हक्काबाबत जाणीव करून देण्यात या माध्यमाचा वापर प्रभावी ठरला, परिणामी मतदान केल्यानंतर स्वत:ची सेल्फी काढणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. मतदारांनी आपला हक्क बजवावा यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गेल्या महिनाभरापासून जोरदार प्रयत्न चालविले होते. त्यासाठी सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, अभिनेता चिन्मय उदगिरकर, मिस युनिर्व्हस नम्रता कोहोक यांचा दूत म्हणून नेमतानाच अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून जागृती करण्यात येत होती. परिणामी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग मंगळवारी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगांमुळे स्पष्ट झाला. परंतु यात सर्वाधिक हातभार सोशल माध्यमाचा लागला. व्हॉट्स अप, फेसबुक, ट्विटर, टेलिग्रामच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कविता, स्लोगन, चित्रपटातील संवादाचा खुबीने वापर करण्यात आला. जाती-पातीचा वापर मतदानात होऊ नये म्हणून ‘जात बघून मतदान करू नका, तुम्ही नगरसेवक निवडताय जावई नाही’ अशा पद्धतीने जाती-पातीवर टीका करण्यात आली आहे तर तुमचे मतदान किती किमती आहे हे समजावून सांगताना ‘अगर आपकी उंगली पर छोटा सा दाग लगने से अच्छे लोगों की सरकार बनती हैं तो समझ लो की ‘दाग अच्छे हैं’ असेही समजावून सांगण्यात आले. मतदाराला प्रलोभनापासून दूर ठेवण्यासाठी ‘पैशाकडे बघून कधीच मतदान करू नका, मोदी कधी नोटा बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही’ अशी खिल्लीही उडविण्यात आली आहे. मतदारांमध्ये उत्सुकता वाढीस लागावी म्हणून, ‘हा मॅसेज फक्त १८ वर्षावरील व्यक्तींनीच वाचावा... मतदान जरूर करा, हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यसुद्धा’ अशाप्रकारे जाणीव करून देण्यात आली. त्याचप्रमाणे, ‘घरात तुमच्या मताला फार महत्त्व दिले नसेल तरी निवडणुकीत तुमच्या मताला फार महत्त्व आहे’ असे सांगतानाच, त्यातून राजकीय टीकाही साधण्यात नेटिझन कमी पडले नाहीत. ‘कुछ तो खासियत हैं मेरे वोट में, वोट देता हूॅँ फकिरोंको, कमबख्त शहंशाह बन जाते हैं’ असे म्हणून भ्रष्ट राजकारण्यांची टोपी उडविण्यात आली. ‘उठा उठा सकाळ झाली, मतदान करण्याची वेळ झाली’ असे भल्या पहाटेच आवाहन करतानाच, ‘आजचा दिवस आपला, मतदान दिवस, सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. कार्यकुशल व चांगल्या, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला मतदान करा व आपले कर्तव्य पार पाडा’ असेही मतदारांना बजावण्यात आले. मतदानासाठी आग्रह धरताना चित्रपटांच्या नावांचा उपयोग करून काहींनी कल्पकता लढविली, त्यात म्हटले...‘ प्रचारातील आश्वासनांना बळी पडून सैराट होऊ नका, आश्वासनांचे फुगे उडतच राहतील. कोणत्याही पार्टीचे विचार करताना सध्या ती काय करते हे पाहण्यापेक्षा तिने माझ्यासाठी काय केले अथवा ती माझ्यासाठी काय करू शकते याचा विचार करा आणि मगच आपलं मत द्या. (प्रतिनिधी)