...तर पाकला सडेतोड उत्तर
By Admin | Updated: July 15, 2015 01:47 IST2015-07-15T01:47:33+5:302015-07-15T01:47:58+5:30
...तर पाकला सडेतोड उत्तर

...तर पाकला सडेतोड उत्तर
नाशिक : प्रत्येक देशाची विदेशनीती ठरलेली असते. त्यानुसार शेजारी देशांशी मित्रत्वाचे संबंध असावेत, हिच भारताची इच्छा आहे त्यात पाकिस्तानही आलाच. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडे मैत्रीसाठी हात पुढे केला आहे. परंतु यावेळी वाईट अनुभव आल्यास भारत त्याला सडेतोड उत्तर देईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजारोहणाच्या कार्यक्रमास आले असता ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित होते. पाकिस्तानशी आपण कायम मित्रत्वाचे संबंध व्हावेत, यासाठी प्रयत्न करतो. परंतु त्यांच्याकडून त्यावर उलट प्रतिक्रिया येते, असे विचारले असता राजनाथसिंह म्हणाले की, आता आम्ही सडेतोड उत्तर देत आहोत. गेल्या काही महिन्यांमधील घटनांनी आम्ही पाकला हे दाखवून दिले आहे. आमचे प्रयत्न मित्रत्वाचे आहेत. वाजपेयींनीसुद्धा तेच केले होते. त्यामुळे पंतप्रधानांचे मैत्रीचे प्रयत्न योग्य असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. असे असतानाही पाकने मुंबई हल्ल्यातील आरोपी असलेल्या लख्वीच्या आवाजाचे नमुने देण्यास नकार दिल्याचे विचारल्यावर ते म्हणाले की, आमच्या स्तरावर सर्व प्रयत्न सुरू आहेत. आणखी पुरावे आम्ही पाकला देणार आहोत. यासाठी प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघालाही मध्यस्थी करण्यासाठी आम्ही साकडे घातले आहे.