आतापर्यंत कर्तव्यावरील चार पोलीस शहीद
By Admin | Updated: October 22, 2016 02:05 IST2016-10-22T02:05:21+5:302016-10-22T02:05:56+5:30
शहीद पोलीस स्मृतिदिन : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात चित्ते यांची विशेष कामगिरी

आतापर्यंत कर्तव्यावरील चार पोलीस शहीद
विजय मोरे ल्ल नाशिक
समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्राणपणाने लढत शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ‘पोलीस शहीद दिना’निमित्त देशभरात मानवंदना दिली जात असताना, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत शहीद झालेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे.
राज्यात तसेच जिल्हा आणि शहर मुख्यालयातही या दिवशी शहीद पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन केले जाते. आणि शूर पोलिसांच्या कामगिरीला उजाळा दिला जातो. नाशिक जिल्ह्यात १९५९ ते २०१६ या ५७ वर्षांच्या कालावधीत चार पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत़ विशेष म्हणजे, यातील तीन पोलीस कर्मचारी हे नाशिक शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते़
नाशिक जिल्ह्यातील कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई फिरोजखान अफजलखान पठाण (१९९२), पोलीस नाईक जगदीश मुरलीधर लोंढे (१९९९), पोलीस नाईक कृष्णकांत विनायक बिडवे (२००९) व वीरगाव येथील अरुण रघुनाथ चित्ते (२००८) यांचा समावेश आहे़
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ नागरिकांबरोबरच १४ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले़ त्यामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्यासोबत त्यांचे वाहनचालक पोलीस शिपाई अरुण चित्ते यांचा समावेश होता़ मूळचे सटाणा तालुक्यातील वीरगाव येथील रहिवासी असलेले चित्ते १३ वर्षांपासून साळसकर यांचे वाहनचालक होते़
१५ जानेवारी १९९२ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई फिरोजखान पठाण हे रात्रीच्या वेळी सौभाग्यनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते़ त्यांना सराईत गुन्हेगार शिकलकरी खेमसिंग प्रतापसिंग जुनी हा आपल्या साथीदारांसह दिसल्याने त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला़ त्यातील एकास पकडण्यात त्यांना यशही आले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्याने त्याच्याजवळील सुऱ्याने पठाण यांच्यावर वार केले़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पठाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़
१३ सप्टेंबर १९९९ रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यातील पाटील गल्लीमध्ये दोन राजकीय नेत्यांमध्ये वाद सुरू होते़ कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही़ जे़ सूर्यवंशी व पोलीस नाईक जगदीश मुरलीधर लोंढे (मूळ राहणार सिन्नर) यांनी या दोघांना प्रतिबंध केला़ याचा राग आल्याने एकाने लोंढे यांच्या पोटावर चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या लोंढेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़
१ जून २००९ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील बिट मार्शल पोलीस नाईक कृष्णकांत बिडवे आपल्या सहकाऱ्यासह जेलरोड परिसरात कर्तव्य बजावत होते़ त्यांना स्वामी समर्थ केंद्राजवळ २० ते २५ जण लाठ्या- काठ्या व धारदार शस्त्र घेऊन उभे असल्याचे दिसले़ त्यांनी या इसमांना हत्त्यार टाकून देण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर लाठ्या-काठ्या व तलवारीने हल्ला केला गेला़ त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कृष्णकांत बिडवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़
नाशिक जिल्ह्यातील या चार शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर शासनाने जगदीश लोंढे व कृष्णकांत बिडवे यांच्या मुलास पोलीस खात्यातच अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेतले आहे, तर यातील लोंढे यांच्या खून खटल्यातील संशयित निर्दोष सुटले असून, बिडवे खून खटला जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे सुरू आहे़