महागड्या मोबाइलवर चोरट्यांची नजर
By Admin | Updated: December 12, 2015 00:06 IST2015-12-12T00:04:19+5:302015-12-12T00:06:04+5:30
दोन घटना : रस्त्याने बोलणाऱ्यांचे हिसकाविले मोबाइल

महागड्या मोबाइलवर चोरट्यांची नजर
नाशिक : रस्त्यावर चालताना मोबाइलवर बोलणे नागरिकांना आता चांगलेच महागात पडणार आहे़ याचे कारण म्हणजे महिलांच्या सोनसाखळी खेचणाऱ्या चोरट्यांनी आता महागड्या मोबाइलवर लक्ष केंद्रित केल्याचे गत दोन दिवसांत गंगापूर व पंचवटी पोलीस ठाण्यातील घटनांवरून दिसून येते़ त्यामुळे महागडे मोबाइल वापरणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून चालताना मोबाइलवर बोलताना सतर्क राहावे लागणार आहे़
पंचवटीतील कलानगरमध्ये राहणारा अभिजित राजेंद्र साबळे हा गुरुवारी (दि़ १०) सकाळी सात वाजेच्या सुमारास परिसरातून पायी जात होता़ त्यावेळी मोबाइलवर फोन आल्याने तो बोलत-बोलत जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयितांनी त्याच्याकडील २७ हजार ५०० रुपयांचा मोबाइल खेचून नेला़ या प्रकरणी साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवर घडली होती़ विसेमळा येथील रहिवासी अभय पांढारकर हे कॉलेजरोडने पायी जात असताना फोन आल्याने ते मोबाइलवर बोलत जात होते़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयितांनी त्यांचा मोबाइल खेचून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)