सागवानाची तस्करी; टेम्पो पकडला

By Admin | Updated: July 9, 2016 00:33 IST2016-07-09T00:19:49+5:302016-07-09T00:33:38+5:30

सुरगाणा वनविभागाची कामगिरी : लाकूड, वाहनासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Smuggled; Caught the tempo | सागवानाची तस्करी; टेम्पो पकडला

सागवानाची तस्करी; टेम्पो पकडला

 सुरगाणा : पुढे भरधाव वेगातील चोरट्या सागवानाची तस्करी करणारा ४०७ टेम्पो. पाठलाग करणारे वनविभाग कर्मचाऱ्यांचे शासकीय वाहन आणि वनविभागाच्या मागे चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या सहकाऱ्यांची डस्टर कार व नंबर नसलेली एक नवी मोटरसायकल असा चार वाहनांचा एखाद्या अ‍ॅक्शन चित्रपटात शोभेल असा पाठलागाचा थरार परिसरातील नागरिकांनी मंगळवारी अनुभवला. सुमारे ३५ ते ४० किमी अंतरापर्यंत हा थरार सुरू होता. दरम्यान, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सागवानाची तस्करी करणारा टेम्पो अडविण्यात यश मिळविले. या प्रकरणी वनविभागाने ८८ हजार २५५ रुपये किमतीचे १.८३५ घनमीटर सागवान लाकडांसह टेम्पो, डस्टर कार व एक नंबर नसलेली मोटारसायकल असा अंदाजे १५ ते १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी (दि. ५) सुरगाणा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना खुंटविहीर गावाकडून सागवानी लाकडाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश सातपुते यांनी वनपाल प्रमोद पवार, काशीनाथ गायकवाड, सुभाष भोये, नाना राठोड, गाडर, तुकाराम चौधरी, तुषार भोये, हेमंत गावित, अश्पाक शेख, ठाकरे, राजकुमार पवार या कर्मचाऱ्यांसह डोल्हारे येथील चार रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी सापळा लावला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खुंटविहीर गावाकडून टाटा ४०७ टेम्पो (क्र . एमएच ०१- एल २२४१) वेगाने येत असल्याचे वन कर्मचाऱ्यांना दिसला. त्यांनी या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने चकवा देऊन सदर वाहन सारणे आवणमार्गे पुढे नेला. हेच वाहन सागवान तस्करांचे असल्याची खात्री झाल्याने वन कर्मचाऱ्यांनी या टेम्पोचा पाठलाग सुरू केला. टेम्पोचालक नागमोडी वाहन चालवून वन कर्मचाऱ्यांच्या वाहनाला पुढे निघू देत नव्हता. काही अंतर गेल्यानंतर एक खासगी वाहन पाठलाग करीत असल्याचे वन विभागाच्या वाहनचालकाच्या लक्षात आले. पळसन गावाजवळ वन कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करून तस्करांचे वाहन असल्याचे सांगताच पळसन गावातील काही ग्रामस्थांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला. आमदा (प) गावाजवळ अखेरीस टेम्पो पकडण्यात वनविभागाला यश आले. चालक वाहन सोडून पसार झाला, तर गर्दीचा फायदा घेऊन डस्टर मालक फरार झाला. या दोन्ही वाहनांची झडती घेतली असता, टाटा टेम्पोमध्ये २०, तर डस्टर गाडीत (क्र .डीएन ०९ जे १००७) २ नग असे २२ सागवानी चौपट मिळून आले. वाहनांसह हा मुद्देमाल वणी डेपोत जमा करीत असतानाच रात्री ११.३० वाजेच्या सुमारास खुंटविहीर येथील गणेश वाघमारे (२९) हा होंडा शाईन या नंबर नसलेल्या दुचाकीने डेपोत आला व वन कर्मचाऱ्यांना सागवान व वाहने जप्त केल्याप्रकरणी दमदाटी करू लागला. त्यास वन कर्मचाऱ्यांनी मोटरसायकलसह ताब्यात घेऊन सुरगाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Smuggled; Caught the tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.