‘स्मार्ट सिटी’ संदिग्ध ठेवण्यामागे शासनाची चतुराई

By Admin | Updated: November 20, 2015 23:59 IST2015-11-20T23:58:29+5:302015-11-20T23:59:00+5:30

गाडगीळ : दाभोलकर व्याख्यानमालेत प्रतिपादन

The smartness of the government about keeping 'smart city' suspicious | ‘स्मार्ट सिटी’ संदिग्ध ठेवण्यामागे शासनाची चतुराई

‘स्मार्ट सिटी’ संदिग्ध ठेवण्यामागे शासनाची चतुराई

नाशिक : स्मार्ट सिटी ही नव मध्यमवर्गीयांसाठी नवीन शहरे उभारण्याची योजना असली तरी मुळातच ही कल्पना अद्याप संदिग्ध आहे. त्यामुळे स्पर्धात्मक शहर ही पाश्चात्य कल्पना राबवून त्याचा लोकसहभाग घेतला जात असला तरी लोकांनाही ही कल्पना कळू नये आणि भागीदार कंपन्या किंवा देश म्हणतील त्या पद्धतीने योजना वाकवता यावी यासाठी शासनाने चतुराईने ही योजना संदिग्ध ठेवण्यात यश मिळवले असल्याचे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित गाडगीळ यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेत २३ वे पुष्प रणजित गाडगीळ यांनी स्मार्ट सिटी आणि लोकसहभाग या विषयावर गुंफले. लोकांचा सहभाग हा यंत्रणांच्या मूल्यमापनासाठी घेतला जात असेल तरी त्यातून फार कोणते बदल आपल्याकडे होतील याची शाश्वती नाही, त्यामुळे स्मार्ट सिटीला विरोध करावा किंवा सकारात्मकदृष्टीने सामोरे जावे हा वेगवेगळ्या विचारसरणीचा भाग असला तरी संघटनांच्या जागरुकतेमुळे यातील गैरलागू व्यवस्था अंमलात येऊ शकत नाही, हे नेहरू नागरी अभियानाच्या हवाल्यावरून त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटी ही नेहरू नागरी अभियानाच्या धर्तीवरील एक योजना आहे. भाजपा सरकारने सार्वत्रिक निवडणुकीत शंभर नवी शहरे वसविण्याचे सर्वप्रथम जाहीर केले आणि त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्या अंदाजपत्रकात स्मार्ट सिटीचा उल्लेख केला. स्मार्ट सिटी म्हणजे काय हे जानेवारी महिन्यात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आणि नंतर हा मजकूर हटविण्यात आला. त्यामुळे आज नाशिक पुण्यासह सर्वत्र स्मार्ट सिटीचा गजर चालला असला तरी ते नक्की काय आहे, हे कृष्णधवल कागदावर स्पष्ट नाही असे सांगून ते म्हणाले की, नव्या मध्यमवर्गीयांना सध्याचे बकालपण नको असल्याने त्यांच्यासाठी नवीन शहर वसवणे आणि स्मार्ट म्हटले म्हणजे त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे हे ओघानेच आले. त्यासाठी थेट परकीय गुंतवणूक येणार आहे. शहरे स्मार्ट करून गुंतवणूक योग्य बनविणे ही अमेरिकन पद्धती आहे. मात्र, त्यातून सुविधांना तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी मानसिकता बदलू शकते काय असा प्रश्न त्यांनी केला. लोकसहभागाचा सध्या बोलबाला असला तरी सेवेचे मूल्यांकन करून ती यंत्रणा बदलणारच नसेल तर काय उपयोग असा प्रश्न त्यांनी केला.
प्रारंभी प्रा. मिलिंद वाघ यांनी त्यांचा परिचय करून दिला. लोकनिर्माणचे संतोष जाधव यांनी त्यांचा स्वागतपर सत्कार केला. सचिन मालेगावकर यावेळी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: The smartness of the government about keeping 'smart city' suspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.