‘स्मार्ट’ पोलीस ठाण्याचा गलथान कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:59 PM2019-03-13T23:59:38+5:302019-03-14T00:08:04+5:30

‘स्मार्ट’ पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यामधील गलथान कारभार दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ठाणेप्रमुखांची कानउघाडणी केली.

The 'smart' police station administration system | ‘स्मार्ट’ पोलीस ठाण्याचा गलथान कारभार

‘स्मार्ट’ पोलीस ठाण्याचा गलथान कारभार

googlenewsNext

पंचवटी : ‘स्मार्ट’ पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यामधील गलथान कारभार दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ठाणेप्रमुखांची कानउघाडणी केली. एका कौटुंबिक वादाच्या घटनेत प्राणघातक हल्ल्याचा लावलेला कलम बदलण्यासह कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश देत अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी संतापून पोलीस ठाण्यातून निघून जाणे पसंत केले.
नवनियुक्त आयुक्त नांगरे पाटील यांनी बुधवारी (दि.१३) दुपारी दोन वाजता पंचवटी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. यावेळी कोठडीत असलेल्या गुन्हेगारांची चौकशी केली. त्यांच्या अचानक भेटीमुळे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच धावपळ उडाली. ‘स्मार्ट’ म्हणून मिरवून घेणाºया पंचवटी पोलिसांचा गलथान कारभार पाहून नांगरे पाटील यांनाही धक्का बसला.
कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा कसा? असा प्रश्न आयुक्तांनी करताच ठाणे अंमलदाराची भंबेरी उडाली. यावेळी आयुक्त नांगरे पाटील यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन अदखलपात्र गुन्हा नोंदवा, असे बजावले. आयुक्तांच्या नजरेतून पोलीस ठाण्याचा गलथान कारभार सुटू शकला नाही.
दिवसभर भेटीची चर्चा
नांगरे पाटील यांच्या अचानक पंचवटी पोलीस ठाणे भेटीची दिवसभर परिसरात चर्चा सुरू होती. त्यांच्या अशा धडक भेटीमुळे अन्य पोलीस ठाणे प्रमुखांचेही धाबे दणाणले असून, काही ठाणेदारांनी तर तत्काळ वाहन सोडून पायी रस्त्यावर अवतरत ‘एरिया डॉमिनेशन’ करणे सुरू केले आहे. या भेटीनंतर एक मात्र स्पष्ट झाले आहे, ते म्हणजे कधीही कोणत्याही पोलीस ठाण्यात नांगरे पाटील अवतरू शकतील.

Web Title: The 'smart' police station administration system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.