क्रिसिलमार्फत ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा

By Admin | Updated: September 23, 2015 23:56 IST2015-09-23T23:56:16+5:302015-09-23T23:56:40+5:30

सल्लागार संस्था : ३० रोजी होणार मुंबईत बैठक

Smart City's schematic by CRISIL | क्रिसिलमार्फत ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा

क्रिसिलमार्फत ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा

नाशिक : केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक महापालिकेचा समावेश झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पात्र होण्यासाठी सादर होणारा शहर विकासाचा आराखडा ‘क्रिसिल’ या नामवंत संस्थेमार्फत तयार करण्यात येणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिकचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनामार्फत खास नियुक्त करण्यात आलेले वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत येत्या ३० सप्टेंबरला मुंबईत बैठक होणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानात देशातील ९८ शहरांमध्ये नाशिक शहराचा पहिल्या टप्प्यात समावेश झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी चॅलेंज स्पर्धेत टक्कर देण्याकरिता महापालिकेला सर्वंकष व परिपूर्ण असा विकास आराखडा डिसेंबरपर्यंत केंद्राला सादर करायचा आहे. सदर आराखडा स्पर्धेत टिकाव धरेल आणि तो परिपूर्ण असावा यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रातील निवड झालेल्या दहाही शहरांसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. नाशिक महापालिकेसाठी वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून महापालिकेला २ कोटी रुपयेही दिले जाणार आहेत. तत्पूर्वी, मागील महासभेत नाशिकचा सर्वंकष व परिपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा आणि त्यासाठी २ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. त्याला महासभेने मंजुरी दिल्यानंतर महापालिकांची पत ठरविणारी ‘क्रिसिल’ या नामवंत संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्राने सांगितले.
दरम्यान, स्मार्ट सिटीच्या आराखड्याबाबत गुरुवारी (दि. २४) आयुक्तांनी सर्व विभागीय अधिकारी व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली असून त्यानंतर मुंबईत सीताराम कुंटे यांच्याकडे प्राथमिक बैठक होणार आहे. त्यानंतर स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करण्याला चालना मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Smart City's schematic by CRISIL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.