‘स्मार्ट सिटी’ची हंडी आज फुटणार!

By Admin | Updated: July 31, 2015 00:02 IST2015-07-31T00:02:05+5:302015-07-31T00:02:28+5:30

आयुक्तांकडून सादरीकरण : नाशिकच्या निवडीकडे लक्ष

'Smart City' will be ready today! | ‘स्मार्ट सिटी’ची हंडी आज फुटणार!

‘स्मार्ट सिटी’ची हंडी आज फुटणार!

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात निवड होणाऱ्या दहा शहरांची यादी शुक्रवारी (दि. ३१) राज्य शासनाकडून केंद्राला पाठविली जाणार असून, या योजनेत नाशिकच्या निवडीकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांसमोर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे दमदार सादरीकरण केले. त्यामुळे नाशिकची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या स्पर्धेत नाशिक महापालिकेनेही सहभाग नोंदविला आहे. त्यासंबंधी आवश्यक तो प्रस्तावही राज्य शासनाला सादर केला असून, मंगळवार व बुधवारी मुख्य सचिवांसमोर राज्यातील महापालिकांनी स्मार्ट सिटीसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. नाशिक महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सादरीकरण केले. गेडाम यांनी नाशिकची बलस्थाने मांडतानाच रोजगार निर्मितीसाठी सेवा व आयटी क्षेत्रात पाच वर्षांचे धोरण निश्चितीसंबंधी आश्वस्त केले. याचबरोबर नैसर्गिक, धार्मिक, वाइनविषयक आणि साहसी पर्यटनासंबंधीही प्रकल्पांचे सादरीकरण केले. शहरातील सुमारे ३०० कि.मी. पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम, मलजलशुद्धिकरण केंद्रांची क्षमता वाढविणे, सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत सुधारणा, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत संकलन आणि प्रक्रियांवर भर आणि रस्त्यांची सुधारणा या प्रकल्पांवरही भर देण्यात आला. एखादा विशिष्ट भूभाग निवडून त्यात सुधारणा घडवून आणणे किंवा भूभागावर नव्याने पुनर्निर्माण करणे अथवा नव्याने शहर वसविणे याविषयीही प्रकल्पाची मांडणी करण्यात आली. या साऱ्या प्रकल्पांसाठी लागणारा महसूल प्राप्त करण्यासाठी मिळकतींचे सर्वेक्षण करणे, वॉटर आॅडिट करणे आदि उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. राज्यातील २० शहरांतून दहा शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड करून त्याची यादी राज्य शासनाकडून केंद्राला पाठविली जाणार असून, त्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे. त्यामुळे शुक्रवारी फुटणाऱ्या हंडीत नाशिकच्या नावाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Smart City' will be ready today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.