स्मार्ट सिटीचा जागर, परीक्षांना ठरला अडसर

By Admin | Updated: November 2, 2015 23:13 IST2015-11-02T23:11:35+5:302015-11-02T23:13:42+5:30

चिमुरड्यांची पायपीट : पालिकेचा झाला इव्हेंट, शाळांची झाली पंचाईत

Smart city jagar, the exams get stuck | स्मार्ट सिटीचा जागर, परीक्षांना ठरला अडसर

स्मार्ट सिटीचा जागर, परीक्षांना ठरला अडसर

नाशिक : नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ बनवायची ना, मग चला गल्लोगल्ली प्रभातफेरी काढूया, चमचा लिंबू-झिम्मा फुगडी खेळूया, असा फतवा महापालिका प्रशासनाने शाळांना काढला आणि पहिल्या दिवशी पूर्व विभागात स्मार्ट सिटीचा जागर करण्यात आला. सध्या सहामाही परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने शाळांची मात्र या फतव्याने पंचाईत झाली आणि परीक्षांना अडसर ठरलेल्या स्मार्ट सिटीचा जागर करावा लागला. शहरात शाळांनी ठिकठिकाणी काढलेल्या प्रभात फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मात्र ‘स्मार्ट सिटी’ची भानगड मात्र काही उमगली नाही.
नाशिक महापालिकेचा पहिल्या टप्प्यात ‘स्मार्ट सिटी’ अभियानात समावेश झाला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात उत्तीर्ण होण्यासाठी एक प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारला सादर करायचा आहे. या प्रस्तावात लोकसहभागाला जास्तीत जास्त गुण असल्याने ते ‘कॅश’ करण्यासाठी महापालिकेने दि.२ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत विभागनिहाय शाळांच्या माध्यमातून प्रभातफेऱ्या काढणे, पथनाट्य करणे, वेगवेगळ्या स्पर्धा घेणे आदि उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांसह शहरातील खासगी संस्थांच्या शाळांनाही ‘स्मार्ट सिटी’चा जागर करण्यासाठी प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्याचा फतवा काढण्यात आला आहे.

Web Title: Smart city jagar, the exams get stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.