‘स्मार्ट’ प्रचाराचा खर्च डोईजड
By Admin | Updated: February 14, 2017 01:17 IST2017-02-14T01:17:10+5:302017-02-14T01:17:43+5:30
लाखोंचे पॅकेज : सोशल मीडिया सेवा पुरविणाऱ्या एजन्सीला प्राधान्य

‘स्मार्ट’ प्रचाराचा खर्च डोईजड
नाशिक : या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बहुसदस्यीय प्रभागपद्धती असून, प्रभागाची व्याप्ती मोठी अन् प्रचाराचा कालावधी कमी असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी ‘स्मार्ट’ प्रचाराचा फंडा उमेदवारांनी शोधला असला तरी त्यांना यासाठी लाखो रुपयांचे पॅकेज घ्यावे लागत असल्याने हा खर्च डोईजड होत आहे. मतदारांची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येकाजवळ पोहचणे कदापि शक्य नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात उमेदवारांनी संगणकीकृत प्रचारयंत्रणा राबविण्यात सुरुवात केली आहे. संबंधितांकडून इंटरनेटचा वापर पुरेपूरपणे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शहरातील सुमारे वीस ते पंचवीस कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. या कंपन्यांकडून मतदारांच्या संख्येनुसार दर निश्चित करून पॅकेजेस ठरविले जात आहे. लघुसंदेशाची भाषा, संख्या यावर दर अवलंबून आहेत. इंग्रजीत लघुसंदेश पाठवायचे झाल्यास प्रति संदेश तीस पैसे, तर मराठीत संदेशाचे १५ पैसे प्रति लघुसंदेश याप्रमाणे दर आकारले जात आहे. यासाठी संबंधित कं पन्यांना विविध लोकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माहितीचा साठाही उमेदवारांना उपलब्ध करून द्यावा लागतो. त्यानंतर संबंधित कं पन्यांकडून त्या भ्रमणध्वनीक्रमांकांवर उमेदवाराचा प्रभाग क्रमांक, पक्ष, निवडणूक चिन्ह मतदानाचा वार, दिनांक आदि माहिती असलेला लघुसंदेशांचा भडीमार सुरू केला जातो. मोबाइल क्रमांकांच्या माहितीचा साठा मिळविण्यासाठी काही उमेदवारांनी चक्क मोबाइल कंपन्यांना गाठले आहे. यासाठी उमेदवारांना त्या कंपन्यांनादेखील पैसे मोजावे लागत आहे. कंपन्या किंवा एजन्सीक डून किमान एक लाखाचे पॅकेज घेतल्याशिवाय सेवा पुरविली जात नाही.
लाइव्ह व्हिडीओ संकल्पना
सध्या निवडणुकीच्या हंगामात ‘फेसबुक लाइव्ह’ संकल्पना जास्त लोकप्रिय ठरत आहे. संबंधित उमेदवारांकडून फेसबुकच्या ‘लाइव्ह’ पर्याय निवडून त्या आधारे स्वत:ची चित्रफित संबंधित मतदरसंघामधील तरुणाईपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यासाठी स्वतंत्ररीत्या टेक्नोसॅव्ही युवकांची नियुक्ती उमेदवारांकडून करण्यात आली असून, दिवसभर या युवकांना त्या कामाचा पगारही मोजावा लागतो.