झोपडपट्टीधारकांनी पुन्हा अतिक्रमण केले
By Admin | Updated: November 23, 2014 01:04 IST2014-11-23T01:04:19+5:302014-11-23T01:04:44+5:30
झोपडपट्टीधारकांनी पुन्हा अतिक्रमण केले

झोपडपट्टीधारकांनी पुन्हा अतिक्रमण केले
पंचवटी : चार दिवसांपूर्वीच भल्या पहाटे पोलीस बंदोबस्तात दिंडोरीरोडवरील म्हसोबावाडीतील अतिक्रमण भुईसपाट केल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर पाचशे रुपये भरून जागा मिळत असल्याची अफवा काही समाजकंटकांनी पसरवून जागा मोजणी करून जागेचे वाटप सुरू केल्याने झोपडपट्टीधारकांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. महापालिकेच्या मालकीची जागा असल्याने प्रशासनाने या जागेवरचे अतिक्रमण हटविले असताना आता समाजकंटकांनी पुन्हा त्याच जागा झोपडपट्टीधारकांना देण्याचे प्रयत्न सुरू केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. ज्यादिवशी अतिक्रमण हटविले त्यादिवशी अतिक्रमण पथकावर दगडफेक झाली होती. त्यानंतर काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले होते. नंतर या जागेबाबत मनपा आयुक्त व महापौर यांच्याशी संबंधित झोपडपट्टीधारक चर्चा करण्याचे ठरले होते आणि त्यातून निर्णय घेतला जाणार होता. मात्र, याबाबत कोणता निर्णय झाला हे स्पष्ट झाले नसतानाच झोपडपट्टीधारकांनी पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण केले आहे. (वार्ताहर)