गाेदावरीतून गाळ उपसा की वाळू उपशाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:36+5:302021-07-09T04:10:36+5:30
नाशिक : पुराची तीव्रता कमी करण्यासाठी गोदापात्रातील गाळ काढण्याचे ठरले आणि गाळाऐवजी वाळूच अधिक निघाली. त्यासंदर्भात महसूल विभागाकडे रॉयल्टी ...

गाेदावरीतून गाळ उपसा की वाळू उपशाचा?
नाशिक : पुराची तीव्रता कमी करण्यासाठी गोदापात्रातील गाळ काढण्याचे ठरले आणि गाळाऐवजी वाळूच अधिक निघाली. त्यासंदर्भात महसूल विभागाकडे रॉयल्टी भरण्यात आली खरी; मात्र, हा गाळ काढण्याचा ठेका की वाळू उपशाचा हा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे येथील वाळू उपसा करणे पर्यावरणदृष्ट्या घातक आहे, असा आक्षेप पर्यावरणप्रेमींनी घेऊनदेखील त्यावर कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
स्मार्ट सिटीची मूळ संकल्पना ही पर्यावरण स्नेही असून, शाश्वत विकासासाठी संतुलन ढासळू देऊ नये ही खरी जागतिक संकल्पना आहे. मात्र, प्रत्यक्षात गाेदावरीच्या बाबतीत तसे झालेले दिसत नाही. शहरातील पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढावा, अशी सूचना होती. त्यानुसार मते नर्सरी ते होळकर पुलाच्या दरम्यान गाळ काढण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे; परंतु अपेक्षित प्रमाणात गाळ आढळून तर आला नाहीच उलट तेथे वाळू आढळल्याचे सांगण्यात येते. तेथे वाळू आढळल्यावर महसूल विभागाला स्वामित्वधन देण्यात आले. मात्र, कंपनीच्या करारानुसार अशाप्रकारचे गौण खनिज महापालिकेच्या मालकीची असेल असा स्पष्ट मुद्दा असतानाही त्यावर कार्यवाही झालेली नाही, असा आक्षेप कंपनीच्या काही संचालकांनी घेतला हाेता, तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमींनी वाळू उपशावर आक्षेप घेतल्यानंतरदेखील त्यावर कार्यवाही झालेली नाही. नदीच्या प्रवाहासाठी वाळू आवश्यक असते. त्यामुळे ती काढू नये अशाप्रकारची गोदावरी शुद्धिकरणासंदर्भात उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी मागणी केली. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने त्यावरदेखील कार्यवाही केली नाही. त्यामुळेच नदीतील गाळ काढण्याचा कंपनीचा अट्टहास आहे की, वाळूचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, या कामाची मुदत संपल्यानंतरदेखील काम सुरूच असून, मुदतवाढीच्या हालचाली सुरू झाल्या. त्यातच नदीपात्रातील गाळ काढून नदीच्या तीरावरच ठेवण्यात येत असल्याने पावसाळ्यात गाळ पुन्हा नदीपात्रात वाहून जाईल, अशी तक्रार ॲड. सुयोग शहा आणि वास्तुविशारद सागर काबरे यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यावर महापालिकेने स्मार्ट सिटीकडे पत्रापत्री करून कंपनीचे उत्तर पाठवले असून, त्यात मूळ प्रश्नालाच बगल देण्यात आली आहे. त्यामुळेच स्मार्ट सिटीचे नक्की काय चाललंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इन्फो....
कामाची माहिती देणारा फलकच केला गायब
कोणत्याही कामाच्या ठिकाणी काय काम सुरू आहे, त्याचा कालावधी आणि मक्तेदार काेण याच्या माहितीचा फलक आवश्यक असतो. ॲड. सुयोग शहा आणि सागर काबरे यांनी एक महिन्यापूर्वी स्मार्ट सिटीच्या गाळासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर तक्रारीचे समाधान तर नाहीच; परंतु नदी काठी लावलेला फलकच गायब करण्यात आला आहे.
---------
छायाचित्र आर फोटोवर ०७ स्मार्ट सिटी