गरवारे पॉइंटजवळ झाडांची कत्तल
By Admin | Updated: October 11, 2015 22:26 IST2015-10-11T22:26:27+5:302015-10-11T22:26:55+5:30
मनपाचे दुर्लक्ष : स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आक्षेप

गरवारे पॉइंटजवळ झाडांची कत्तल
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे पॉइंटजवळ असलेल्या एका हॉटेलच्या परिसरातील चंदनाच्या झाडासह १० ते १५ मोठ्या झाडांची विनापरवानगी कत्तल करण्यात आली. याबाबत जीवन नागरी पर्यावरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून, मनपाकडे तक्रार करणार आहे.
गरवारे पॉइंटजवळील एक हॉटेलच्या परिसरात अनेक झाडे आहेत. या झाडांपैकी १० ते १५ झाडे ही मोठ्या प्रमाणात छाटण्यात आली आहेत, तर काही झाडे बुडापासूनच तोडण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, यात एक चंदनाचेही झाड असल्याचे सांगण्यात येत आहे. या झाडांची छाटणी करण्याबाबत हॉटेल व्यावसायिकाने मनपाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे. या झाडांची परवानगी न घेता छाटणी केल्याप्रकरणी जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे जिल्हा अध्यक्ष आबा पाटील मनपाकडे तक्रार अर्ज करणार आहेत. मनपाचा उद्यान विभाग हा नावापुरताच उरला असून, या विभागातील अधिकारी व कर्मचारी कोणतेही काम करीत नसल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
गरवारे पॉइंटजवळील एका हॉटेल व्यावसायिकाने मनमानी कारभार करीत हॉटेलच्या आतील परिसरात असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल केल्याने याबाबत मनपा काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)