कत्तलखाने अजूनही सुरूच

By Admin | Updated: April 13, 2016 00:23 IST2016-04-13T00:14:52+5:302016-04-13T00:23:58+5:30

तिघांना कोठडी :२२ जनावरे जप्त

Slaughter houses still continue | कत्तलखाने अजूनही सुरूच

कत्तलखाने अजूनही सुरूच

इंदिरानगर : वडाळागावातील साठेनगरमधील अवैध कत्तलखाना इंदिरानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतरही याठिकाणी आणखी दोन कत्तलखाने सुरू असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान पोलिसांनी या ठिकाणाहून पुन्हा तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून कत्तलीसाठी आणण्यात आलेली २२ जनावरे जप्त केली आहे़ या तिघा संशयितांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
साठेनगरमधील पत्र्याच्या शेडच्या गुदामामध्ये जनावरांची अवैधपणे कत्तल केली जात असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून इंदिरानगर पोलीस ठाण्यास कळविण्यात आली होती़ त्यानुसार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी अवैध कत्तलखाना सुरू असल्याचे समोर आले़ या ठिकाणाहून दोन संशयितांना अटकही करण्यात आली आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे मंगळवारी (दि़ १२) सकाळी सहा वाजेच्या सुमारास साठेनगरमध्ये गस्त घालत असताना त्यांना ६ गायी व १५ बैल संशयास्पदरीत्या बांधून ठेवल्याचे आढळून आले़ त्यानुसार त्यांनी संशयित नजाउद्दीन शेख (२८), मुश्ताक शेख (२०) व सजाद शेख (२६, तिघेही राहणार संगमनेर) यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ या सर्वांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कत्तलीसाठी ही जनावरे आणल्याची कबुली दिली़ या तिघांवरही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ दरम्यान, या संशयितांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
इंदिरानगरसह परिसरात अवैध कत्तलखाने कार्यरत असून याठिकाणी कत्तल करण्यासाठी जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यात नाशिक पोलिसांनी मोठ्याप्रमाणात जनावरांचे मांस वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. यामुळे परिसरात कत्तलखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जनावरे आणली जात असावीत असा संशय व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Slaughter houses still continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.