स्कायवॉक ‘हवेत’; जीव टांगणीला
By Admin | Updated: January 10, 2016 23:31 IST2016-01-10T23:30:29+5:302016-01-10T23:31:31+5:30
शिक्षणाचा ‘मार्ग’ ठरतोय धोक्याचा : रस्ता ओलांडताना विद्यार्थी-पालकांचाही चुकतो काळजाचा ठोका

स्कायवॉक ‘हवेत’; जीव टांगणीला
अझहर शेख नाशिक
एकीकडे पालिका प्रशासन ’स्मार्ट सिटी’साठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे वाहतूक विभाग रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करत जनजागृती अभियान राबवित आहे. याअंतर्गत येत्या मंगळवारी शहरातील ३१ सिग्नलवर वाहतूक नियमांचे प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे एक हजार विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीचे धडे देणार आहेत. शहरातील अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता असलेल्या द्वारका-सारडा सर्कल येथे चोवीस तास वाहनांची वर्दळ सुरू असते. मुळात हा रस्ता अरुंद. रस्त्याच्या डांबरीकरणाची दुर्दशा, दुभाजकांची दयनीय अवस्था अशा एक ना अनेक समस्यांचे जणू या रस्त्याला ग्रहणच लागलेले. त्यामध्ये रस्ता ओलांडताना येथील नॅशनल उर्दू शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून मार्ग ओलांडावा लागतो. महापालिकेच्या लालफितीत अडकलेला ‘स्कायवॉक’ अद्याप हवेतच आहे. या चौकामध्ये सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, येथे ‘स्कायवॉक’ असणे गरजेचे आहे. कारण सकाळी शाळा सुटण्याची व भरण्याची वेळ असते व याच वेळेत वाहतुकीमध्येही वाढ होेते. द्वारकेवरून शहरात येण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने वाहतुकीचा प्रचंड ताण रस्त्यावर बघावयास मिळतो. एकूणच महापालिका प्रशासनाची उदासीनता व वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे ‘स्कायवॉक’ हवेत लटकलेला आहे. पालिकेच्या उदासीनतेमुळे स्कायवॉक लालफितीत अडकला असून, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या चौकात ‘सेवाकुंज’ अपघाताची पुनरावृत्ती होण्याची प्रशासन वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करूनदेखील ‘स्कायवॉक’ मार्गी लागत नसल्याने तीव्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्यासाठी ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क’ उभारले व त्यामध्ये बळकट स्वरूपात ‘स्कायवॉक’ही साकारला गेला. यावर लाखो रुपयांचा खर्चही पालिकेने केला; मात्र प्रत्यक्षात शहरात जेथे गरज आहे तेथे मात्र स्कायवॉक उभारला जात नसल्याने ‘स्मार्ट’ देखावा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरवर्षी अंदाजपत्रकात स्कायवॉकची तरतूद केली जाते. मात्र, अंमलबजावणी होत नाही, हे दुर्दैव!