शहरातून कौशल्य जनजागृती फेरी
By Admin | Updated: July 16, 2017 00:20 IST2017-07-16T00:20:02+5:302017-07-16T00:20:16+5:30
नाशिक : कौशल्य विकास उपसंचालक कार्यालय व नाशिक क्रेडाईच्या पुढाकाराने शनिवारी (दि.१५) बी. डी. भालेकर मैदानापासून गडकरी चौक परिसरातील आयटीआयपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली.

शहरातून कौशल्य जनजागृती फेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास उपसंचालक कार्यालय व नाशिक क्रेडाईच्या पुढाकाराने शनिवारी (दि.१५) बी. डी. भालेकर मैदानापासून गडकरी चौक परिसरातील आयटीआयपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीत विवेकानंद इन्स्टिट्यूट व श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेसह महिला व्यवसाय व उद्योग प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला. भारत सरकारने दोन वर्षांपूर्वी १५ जुलै रोजी देशव्यापी स्कील इंडिया उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाच्या वर्धापन दिनाचेही या जनजागृती फेरीच्या माध्यमातून औचित्य साधले गेल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली. या जनजागरण फेरीच्या निमित्ताने ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील बांधकाम कारागिरांना प्रशिक्षण देणारे फिरते ‘क्रेडाई कौशल्य केंद्र’ सुरू करण्यात आले असून, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थेचे अध्यक्ष श्री कंठानंद महाराज व विवेकानंद इन्स्टिट्यूटचे संचालक यांच्या हस्ते या फिरत्या कौशल्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास व रोजगार विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सहायक संचालक संपत साठे आदि उपस्थित होते.