सलग सहाव्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:02 IST2020-02-07T23:01:36+5:302020-02-08T00:02:32+5:30
नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या सहाव्या दिवशी शुक्र वारी (दि.७) दुकानदारांचे अतिक्रमित ओटे, पाट्या, पत्र्याचे शेड यांचे अतिक्रमण काढण्यात आले.

भगूर शहरातील सुभाषरोडवरील अतिक्रमण काढताना नगरपालिका कर्मचारी.
भगूर : नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या सहाव्या दिवशी शुक्र वारी (दि.७) दुकानदारांचे अतिक्रमित ओटे, पाट्या, पत्र्याचे शेड यांचे अतिक्रमण काढण्यात आले.
गेल्या शनिवारी आठवडे बाजार राममंदिररोड येथील किराणा दुकान, कार्यालयात कच्चे घरे, गोठ्याचे पक्के बांधकाम आणि सिमेंटचे ओटे जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले. परिसरातील अतिक्रमित टपऱ्या जप्त करण्यात आल्याने त्यास विरोध होऊन काहीकाळ गोंधळ उडाला होता. नागरिकांनी नगराध्यक्ष अनिता करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नागरिकांना अतिक्रमण काढण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही प्रशासकीय बाब असल्याचेही करंजकर यांनी तक्रारकर्त्या नागरिकांना समजावून सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून भगूर नगरपालिका प्रशासनाने अनेक अतिक्रमित टपरीधारकांना नोटीस व तोंडी सूचना देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले. अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमित मालमत्तेवर निशाणी करण्यात आले होते. निर्धारित वेळेत संबंधितांनी त्यांचे अतिक्रमण काढून न घेतल्याने अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. अतिक्रमण पथकप्रमुख मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, रवींद्र संसार, रमेश राठोड, मोहन गायकवाड, यू. के. रॉय, रमेश कांगणे, राहुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कामगार कारवाई करीत आहेत.