पराभूत मानसिकतेत षटकार मारल्याचा आनंद
By Admin | Updated: February 26, 2017 00:03 IST2017-02-26T00:02:59+5:302017-02-26T00:03:11+5:30
पराभूत मानसिकतेत षटकार मारल्याचा आनंद

पराभूत मानसिकतेत षटकार मारल्याचा आनंद
नाशिक : सत्तेची कवचकुंडले गळून पडल्यावर काय अवस्था होती, हे पहायचे असल्यास सध्याच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या परिस्थितीचे अवलोकन करावे लागेल. पाच वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून कॉँग्रेसला झिडकारणाऱ्या राष्ट्रवादीला यंदाच्या निवडणुकीत त्याच कॉँग्रेससोबत फरफटत जाण्याशिवाय जसा पर्याय उरला नाही, तसेच या पक्षाला नजीकच्या काळात सहमतीचे राजकारण करूनच येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसची पराभूत मानसिकता होती, त्यामुळे या पक्षाचे नेते स्वबळाची भाषा जरी करीत असले तरी, महापालिकेच्या सर्व प्रभागात उमेदवार तरी मिळतील काय, असा कळीचा प्रश्न खासगीतही ते नाकारत नव्हते. त्यामुळेच की काय समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर प्रदान करण्यात आले. अर्थात ही सारी तयारी निवडणुकीच्या घोषणेनंतरची असली तरी, तत्पूर्वी पक्षाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या स्थानिक नेतृत्वात बदल करून शिडात हवा भरण्याचा प्रयोग करण्यात आला. पक्षावर एकहाती पकड ठेवणारे छगन भुजबळ, समीर भुजबळ भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरुंगात गेल्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावर दोन पावले मागे सरकलेल्या राष्ट्रवादीला घरघर लागल्याचे पाहून अनेकांनी सोडचिठ्ठी देत सोयीच्या राजकारणासाठी दुसरा घरोबा तर केलाच, परंतु पक्ष सत्तेची फळे चाखत असताना त्यात सामील होऊन स्वत:च्या तुंबड्या भरण्यात अग्रेसर असलेल्यांनीदेखील पक्षापासून फारकत घेतली. पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीच पक्षाकडे पाठ फिरविल्याने कार्यकर्ते तरी कसे टिकतील, असा प्रश्न ज्यावेळी उभा राहिला, त्याचवेळी पक्षाच्या नेतृत्वात बदल करून रंजन ठाकरे या तरुण कार्यकर्त्याकडे पक्षाची धुरा सोपविण्यात आली. पक्षाच्या जुन्या व ज्येष्ठ नेते तसेच नवीन कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून पक्षात चैतन्य निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होत नाही तोच निवडणुकीचे नगारे वाजल्याने दुहेरी कर्तव्य बजावण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे पक्षाची ताकद ओळखूनच ठाकरे यांनी कॉँग्रेसशी निवडणूकपूर्व युती करण्याची पावले टाकली, ते केल्यानेच पक्षाला सहा जागांवर यश मिळविता आले. केंद्रात व राज्यातून मतदारांनी झिडकारलेल्या राष्ट्रवादीने गेल्या पंचवार्षिकमध्ये महापालिकेत कोणत्या ना कोणत्या कारणाने सत्तेत आपला सहभाग नोंदविला असल्यामुळे महापालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे तसे अवघड होते, त्यामुळेच की काय नोटबंदी हाच एकमेव मुद्दा घेत राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरे गेली. त्यातून किती यश मिळाले हे सर्वांच्या समोर असले तरी, प्रतिकूल परिस्थितीतून राष्ट्रवादीने मिळविलेले यश पक्षाला आजही पुरेसे वाटू लागले आहे, कारण पक्षाच्या विद्यमान २० नगरसेवकांपैकी सहा जणांनी दुसरा घरोबा केला तर पाच जणांनी उमेदवारी न करण्यात धन्यता मानली. उर्वरित आठ जणांनी पुन्हा रिंगणात उडी घेतल्यामुळे आलेल्या सहा जागांमुळे पक्षाने षटकार ठोकल्याचा आनंद आहे.