‘हाथवे’ला सहा लाखांच्या दंडाची नोटीस
By Admin | Updated: April 24, 2016 01:03 IST2016-04-24T00:06:00+5:302016-04-24T01:03:26+5:30
सेटटॉप बॉक्स : बनावट केबलचालक प्रकरण

‘हाथवे’ला सहा लाखांच्या दंडाची नोटीस
नाशिक : संपूर्ण डिजिटीलायझेशनचा भाग म्हणून मालेगाव शहरात खासगी कंपन्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या दूरचित्रवाणीला सेटटॉप बॉक्स बसविण्याच्या मोहिमेत बनावट केबलचालक उभे करून सेटटॉप बॉक्स बसविल्याची माहिती सादर केल्याप्रकरणी करमणूक कर विभागाने हाथवे केबल नेटवर्क या कंपनीस सहा लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.
मालेगाव शहरात सध्या खासगी दूरचित्रवाहिन्यांच्या कार्यक्रमाचे प्रसारण करणाऱ्या डेन एनसीसीएन या कंपनीकडून सेटटॉप बॉक्स बसविले जात असून, त्याच्या स्पर्धेत हाथवे कंपनीने मैदानात उडी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी केबलचालकांना आपलेसे करून त्यांच्या माध्यमातून सेटटॉप बॉक्स लावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी डमी केबल आॅपरेटरच्या नावे त्यांनी काही भागांमध्ये सेटटॉप बॉक्स बसविल्याचे महसूल विभागाला कळविले. दरम्यान, त्याची महसूल विभागाने खात्री केली असता, ज्या केबलचालकांच्या माध्यमातून हाथवे कंपनीने सेटटॉप बॉक्स बसविल्याचे कागदोपत्री दाखविले ते केबलचालकच नसल्याचे कागदपत्रांवरून सिद्ध झाले, शिवाय ज्यांच्याकडे सेटटॉप बॉक्स बसविले त्या ग्राहकांना साधी पावतीही कंपनीने दिलेली नाही व केबलचालकांकडेही कोणतीही नोंद आढळून आली नाही. त्यामुळे मुंबई करमणूक शुल्क अधिनियम १९२३ चे कलम ५ अन्वये विविध कलमांखाली सहा लाख रुपये दंडाची नोटीस कंपनीला बजावण्यात आली आहे. या कारवाईसंदर्भात काही म्हणणे असेल तर सोमवार दि. २५ रोजी मालेगाव तहसीलदारांसमक्ष लेखी खुलासा सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.